मुंबई : पुढचे आणखी ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात खास करून हा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याचीही शक्यता आहे. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या विविध भागात हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
अवकाळी पावसामुळं फळपिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय रब्बी पिकांनाही या पावसाचा फटका बसण्याची भीती आहे. याआधी मुंबईत सकाळी सकाळी पावसाची रिपरिप सुरू होती. काही दिवसांपासून मुंबईत देखील ढगाळ वातावरण आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. महाराष्ट्रात सध्या थंडी असताना यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आधीच खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना आता पुन्हा रब्बी पिकाचे नुकसान होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे.
पावसाळा आणि हिवाळा अशा दोन ऋतूंचा अनुभव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पावसाचा सामना नागरिक करत आहेत. हवामानातील या बदलांचा सर्वाधिक परिणाम गहू आणि हरभरा या दोन रब्बी पिकांवर दिसून येत आहे.
हे वातावरण पिकांच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव या वातावरणामुळे वाढत असल्याचं तक्रार नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि येवल्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.