'चतुरंग' प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, नगरच्या डॉ. धामणे दांपत्याचा सन्मान

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र आणि डॉ. सौ. सुचेता धामणे यांना दिला जाणार आहे. निराधान, मनोरुग्णांसाठी केलेल्या अविरत सेवेचा गौरव म्हणून डॉ. धामणे यांचा हा सन्मान केला जाणार आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 25, 2023, 06:57 PM IST
'चतुरंग' प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, नगरच्या डॉ. धामणे दांपत्याचा सन्मान title=

मुंबई : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी  ' जीवनगौरव पुस्कार ' (Lifetime Achievement Award)  दिला जातो. 1999 पासून ही परंपरा सुरु असून जीवनभराच्या सृजनशील आणि मौलिक कार्याने लक्षणीय भर घालून महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही जीवनमान समृद्ध करणाऱ्या व्यक्तिचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो.  यंदाच्या सामाजिक क्षेत्रीय जीवनगौरव पुरस्कारासाठी नगरच्या डॉ. राजेंद्र आणि डॉ. सौ. सुचेता धामणे  (DR Rajendra and Dr Suchita Dhamne) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षातेखालील समितीने ही निवड केली आहे. 

धामणे दाम्पत्याची अविरत सेवा
गेल्या 25 हून अधिक वर्षे अहमदनगर जिल्ह्यातील माउली सेवा प्रतिष्ठान, मनगांवच्या माध्यमातून डॉ. राजेंद्र आणि डॉ.  सुचेता धामणे हे दांपत्य निराधार, मनोरुग्ण, बलात्काराने पिडित अशा महिलांच्या आणि त्यांच्या बालकांचा अत्यंत प्रेमाने सांभाळ करीत आहेत. आजमितीस साडेचारशे महिला आणि चाळीस बालकांचा यात समावेश आहे. पिडित महिलांना आवश्यक ती सर्व मदत तसंच  वैद्यकीय सेवा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा वसा या  दांपत्याने घेतला आहे. 

त्यांच्या या कार्याची योगदानाची दखल घेऊन निवड समितीने डॉ. राजेंद्र आणि डॉ.  सुचेता धामणे यांची यावर्षीच्या चतुरंग 'जीवनगौरव पुरस्कारा' साठी निवड केली आहे. चतुरंगचा हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या स्वीकृत जीवनाला विनम्र अभिवादन असल्याची भावना  प्रतिष्ठाने व्यक्त केली आहे. 

पुरस्काराचं स्वरुप
मानपत्र, सन्मानचिन्ह  आणि तीन लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी चतुरंगचा सामाजिक क्षेत्रीय पुरस्कार मावशी हळबे, डॉ. इंदुमती पारीख, , पांडुरंगशास्त्री आठवले, नानाजी देशमुख, साधनाताई आमटे, शरद जोशी, गिरीश प्रभुणे आणि सय्यदभाई या मान्यवरांना देण्यात आला आहे. या जीवनगौरव पुरस्कारच्या प्रदानाचा 'रंगसंमेलन सोहळा ' यावर्षी डिसेंबर 2023 मध्ये करण्यात येणार आहे.