Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...

Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे. 

सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2023, 10:28 AM IST
Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...  title=
Mumbai Water supply to be affected in parts of city between June 4 to June 8

Mumbai Water News : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईवर पाणीसंकटाची चाहूल लागली आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ 12.76 टक्के टक्के पाणी शिल्लक आहे. हे पाणी केवळ पुढचे 25 दिवस पुरेल इतकेच आहे. अद्याप राखीव साठ्याचा वापर करण्यास राज्य सरकारने मुंबई महापालिकेला परवानगी दिलेली नाही आहे. त्यातच पाऊस लांबल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.

कमीदाबाने पाणीपुरवठा

दरम्यान, मुंबईत 4 जून ते 8 जून या कालावधीत शहराच्या काही भागात कमीदाबाने पाणीपुरवठा होणार आहे. रविवार, 4 जून 2023 ते गुरुवार, 8 जून 2023 या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल विभागामार्फत पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ (पूर्व) परिसरात दोन मोठे जलकुंभाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे एच/पूर्व प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी  मोडक सागर : 28.83 टक्के, तानसा : 25.06 टक्के, मध्य वैतरणा : 10.67 टक्के, भातसा : 11.19 टक्के, विहार : 27.90 टक्के आणि तुळशी धरणात 32.18 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाणीसाठी कमी असल्याने मुंबईकरांचं काही टेन्शन वाढले आहे. पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आहे.

मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट

पुढच्या दोन दिवसांत अरबी समुद्रात मान्सून दाखल होणार आहे. मात्र मुंबईकरांना मान्सूनची प्रतीक्षाच करावी लागेल. कारण मुंबईत 17 जूननंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट असणार आहे. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा फटका मान्सूनला बसणार आहे. 7 ते 9 जूनदरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरुन गुजरातकडे मार्गक्रमण करेल. दक्षिण कोकणात मात्र मान्सूनचे आगमन 10 ते 12 जूनदरम्यान होईल. 

मुंबईकर घामाघुम, वीजेच्या मागणीत प्रचंड वाढ 

एकीकडे मुंबईत मान्सून उशिरा दाखल होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना उकाड्यापासून सध्या तरी दिलासा मिळणार नाही, असेच दिसून येत आहे. मात्र वाढत्या उकाड्यामुळे वीजेच्या मागणीतही प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत 3 हजार 968 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवण्यात आली. यंदाच्या उन्हाळ्यातला हा उच्चांक आहे. उकाड्यामुळे घरी तसंच ऑफिसमध्येही दिवसभर पंखे, एसी आणि कुलर्स सुरु असल्याने मागणीत वाढ झाली आहे.

दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होणार आहेत. मुंबईतल्या प्रसिद्ध जे.जे. रुग्णालयात डॉक्टर्समधल्या वॉरमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जेजेतील जवळपास 750 निवासी डॉक्टर्सनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.