नो टेन्शन ! भाजीपाल्याचा मोठा पुरवठा, आजपासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा

बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून उद्यापासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Updated: Mar 26, 2020, 11:39 PM IST
नो टेन्शन ! भाजीपाल्याचा मोठा पुरवठा, आजपासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तसेच संचारबंदीही लागू आहे. त्यामुळे अचानक अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला. भाजी पाल्याचाही प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने २४ तास उघडी राहणार आहेत. तसेच आज नवी मुंबई ,पुणे  कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरु झाले आहे.  बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून उद्यापासून भाजी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरु

आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथे २० ट्रक आणि थेट मुंबई शहरात १२ ट्रक भाजीपाला पुरवठा झाला आहे तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१ ट्रक भाजीपाला आला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरात भाजीपाल्याची टंचाई नाही. ग्राहकांनी गर्दी करु नये असे आवाहन पणन विभागाने केले आहे. कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे कामगार बाजार समितीमध्ये कामावर येऊ शकत नव्हते आणि शेतमाल पुरवठा करणाऱ्या वाहनांचया ये-जा होण्याच्या अडचणी येत होत्या. 

 आता शेतमाल घेऊन  ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट्रकचालकांना इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी ट्रकवाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यानंतर रिकाम्या परतणाऱ्या वाहनांना सुद्धा  विशेष पास देण्यात येत आहेत. त्यामुळे आता शेतमाल घेऊन  येणाऱ्या वाहनाला अडचणी नाहीत. 

बाजार समितीचे मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करत असतात त्याच्या सुरक्षिततेसाठी व तिथे सुद्धा कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील मालवाहू ट्रकवाहतूक पुन्हा सुरु झाली होणार आहे. शेतकऱ्यांनीही आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घेऊन यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.