मुंबई : मुंबईतील सर्वात मोठं आकर्षण आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाला (lalbagh Raja 2021) निरोप देण्यात आला. गिरगाव चौपाटीच्या समुद्रात 'श्रीं'च्या मुर्तीचे दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.
लालबाग मंडळापासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत भाविकांनी 'श्रीं'च्या मुर्तीचे दर्शन घेतले. कोरोनाच्या संकटामुळे विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली होती. तरी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची काहीशी गर्दी दिसून आली.
मुंबईतील मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन होते. परंतु कोरोना संकटामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन पूर्ण नियमांचे पालन करून लवकर करण्यात आले आहे.
मुंबईच नाही तर जगभरातील लोकांनी ऑनलाईन लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पाहिला.
भक्तांनी गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घातली. कोरोना नष्ट होऊ दे आणि पुढच्या वर्षी नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि जल्लेशात तुझा सण साजरा होऊ दे अशी प्रार्थना भक्तांनी केली.