मुंबई : दिवाळीच्या प्रकाशपर्वामध्ये ज्याप्रमाणे सर्वत्र प्रकाशाची उधळण होते. त्याचप्रमाणे मानवी जीवनातीव विविधरंगी क्षणांचं प्रतिक असणाऱ्या रांगोळीच्या माध्यमातून रंगांचीही उधळण होते. दिवाळीच्या उत्साही दिवसांमध्ये सुबक अशी रांगोळी काढण्यास अनेकजण हिरीरिने पुढे येतात. या दिवसांमध्ये खास अशा रांगोळी प्रदर्शनांचंही आयोजन करण्यात येतं.
रेषा, रंग, नक्षी, छायाचित्र आणि तितकीच प्रभावी रंगसंगती यांची जोड देत अनेक कलाकार भव्य अशा रांगोळ्या साकारतात. अनेकदा या रांगोळीतून दैनंदिन जीवनातील अविस्मरणीय प्रसंगांचा आणि मानवी भावभावनांचीही झलक पाहायला मिळते. रांगोळी रेखाटण्याची हीच कला सर्वांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे, भूषण वैद्य या कलाकाराने.
मुंबईतील जोगेश्वरी येथे रंगावली परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सवात भूषणने एका राजकीय व्यक्तीमत्वाची रांगोळी साकारलीय ही राजकीय व्यक्ती म्हणजे आपल्या दमदार भाषणाने साऱ्या देशाचं लक्ष वेधणारे ३४ वर्षीय खासदार जामयांग त्सेरिंग. भूषणने काढलेल्या या रांगोळीतून त्याला अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित करायचा होता. ज्यासाठी त्याने ही रांगोळी साकारली.
Thanks Bhushan Vaidya ji for this portrait. pic.twitter.com/ETAW0UsMBa
— Jamyang Tsering Namgyal (@MPLadakh) October 31, 2019
अतिशय लक्षवेधी आणि बरेच बारकावे टीपत साकारण्यात आलेली ही रांगोळी त्सेरिंग यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भूषण वैद्य यांच्या मित्रांनी अनेक प्रयत्न केले. याचदरम्यान, त्यांचा दूरध्वनी क्रमांक मिळताच भूषणने स्वत: त्यांना या रांगोळीचा फोटो पाठवला. जवळपास रात्रीच्या अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने रांगोळीचा फोटो त्सेरिंग यांना पाठवला. ज्यावर मध्यरात्र उलटून गेल्यानंतर दोन वाजण्याच्या सुमारास त्यांनी उत्तर दिलं. या कलाकृतीसाठी भूषणचे आभार मानत त्यांनी स्वत: या रांगोळीचा फोटो ट्विटरवर शेअर केला. जो अनेकांपर्यंत पोहोचलासुद्धा.
आपल्या कलाकृतीतून जी व्यक्ती साकारण्यात आली आहे, त्याच व्यक्तीकडून असं कौतुक होत असल्याचं पाहून भूषणला आनंद झाला. याचविषयी सांगताना तो म्हणाला, 'अनुच्छेद 370 रद्द केल्याच्या निर्णयावर आधारित रांगोळी मला काढायचीच होती. त्याकरता काय करता येईल असा विचारही सुरू होताच. त्यातच एक बाब लक्षात आली. जामयांग त्सेरिंग नामग्याल यांच लोकसभेतील भाषण अतिशय गाजलं. मी त्या भाषणाने खूप प्रभावित झालो. परिणामी मी त्यांचीच रांगोळी काढण्याचा निर्णय घेतला. आणि त्या रांगोळीचं त्यांनी कौतुक केलं म्हणून मला भरपूर आनंद आहे'. आपल्या कलेला अशी दाद मिळण्याच्या आनंदासोबतच नुकतच लडाखला वेगळ्या केंद्रशासित प्रदेशाचा अधिकृतपणे दर्जा मिळाल्यामुळे तर त्याचा आनंद द्विगुणितच होत आहे. कलेच्या माध्यमातून त्याची व्यक्त होण्याची पद्धत खरंच प्रशंसनीय आहे.