मुंबई : 'कोहिनूर स्केअर' प्रकरणी उन्मेष जोशींच्या चौकशीचा आजचा सलग तिसरा दिवस आहे. उन्मेष हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे पुत्र आहेत. काल उन्मेष जोशींची ईडीनं सलग आठ तास मॅरेथॉन चौकशी झाली. त्यांचे भागीदार आणि बांधकाम व्यावसायिक राजन शिरोडकरांचीही चौकशी झाली. आजही शिरोडकर यांना चौकशीसाठी बोलावलंय. शिरोडकर राज ठाकरेंचे निकटवर्तीय आहेत. सलग तीन दिवस उन्मेष जोशींची चौकशी होतेय आणि उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय. शिरोडकरांकडे कोहिनूरसंदर्भातल्या काही कागदपत्रांची मागणी ईडीनं केलीय.
जोशी आणि शिरोडकर या दोघांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवून त्यांनी दिलेली माहिती पडताळून पाहिली जातेय. त्यानंतर त्यांची समोरासमोर बसवूनही चौकशी केली जाणार आहे. 'इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग एण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस' (IL & FS) कर्जवाटपाबाबत उन्मेष जोशी यांची चौकशी केली जातेय.
ईडीच्या नोटीशीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज ठाकरेंची चूक नसेल तर त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर आपल्यावर राजकीय दबाव टाकण्यासाठी हे प्रकरण उकरून काढल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं आहे.