मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. 'हप्ता चालू काम बंद' अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदर मेट्रोचं काम बंद, अशी टीका सोमय्यांनी केली आहे. हा महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार असल्यांचही ते म्हणाले. युतीच्या काळात शांत बसलेले भाजप नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. नवीन सरकार आल्यानंतर मला शिवसैनिकांकडून धमक्या येण्याचं प्रमाण वाढलं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दूरध्वनी, फेसबुक आणि ट्विटर या माध्यमातून वारंवार मला धमक्या दिल्या जात आहेत. दोन वर्षांपूर्वीच्या हल्ल्यात वाचलास, आता वाचणार नाही, असे सांगून मला धमकावलं जात असल्याने सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असं किरीट सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्यांनी राज्यपाल आणि गृहसचिवांना याबाबत पत्रही पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. आतापर्यंत अनेक घोटाळे मी उघडकीस आणल्यानेच मला शिवसेनेकडून धमक्या येत आहेत. शिवसेनेची ही गुंडगिरी जगासमोर यावी यासाठी राज्यपाल आणि गृहसचिवांना पत्र पाटवलं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.