मुंबई : Metro car shed disputed land in Mumbai :मेट्रो कारशेडचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आरे येथील मुंबई मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे हलविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, येथील जागेवर केंद्र सरकाने दावा केल्याने हा प्रकल्पाचे काम सध्या स्थगित आहे. दरम्यान, कांजूर मार्ग प्रस्तावित कारशेड भूखंड प्रकरणात 868 हेक्टर जागा ही राज्य सरकारची तर त्यापैकी 92 हेक्टर जागा केंद्र सरकारची आणि 13 हेक्टर जागा ही मुंबई महापालिकेची असल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे.
कांजूरमार्गच्या जागेवर मुंबई महापालिकेनेही दावा केला आहे. याप्रकरणी महापालिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या भूखंडावर डम्पिंग ग्राऊंड उभारण्यासाठी 141 हेक्टर भूखंड सर्वोच्च न्यायालयात केंद्र आणि राज्य सरकारला महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते, असे महापालिकेच्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यापैकी 23 हेक्टर जागेवर कांदळवन असून ती जागा वनविभागाच्या अखत्यारित आहे.
ही जागा आदर्श वॉटरपार्क अँड रिसॉर्ट या खासगी कंपनीनं न्यायालयाची फसवणूक करून मिळवला असून हा व्यवहार बेकायदेशीर ठरवण्यात यावा, अशी मागणी मुंबई महापालिकेच्यावतीने उच्च न्यायालयाकडे केली आहे. मेट्रो कारशेडसाठी कांजूर इथल्या प्रस्तावित भूखंडावर केवळ केंद्राचाच नव्हे तर राज्य सरकारचाही तेवढाच अधिकार असल्याचा राज्य सरकारतर्फे मुंबई न्यायालयात दावा करण्यात आला आहे.