मुंबई: महाराष्ट्रात राज्य सरकारचे अत्याचार आणि दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा, अशी मागणी अभिनेत्री कंगना राणौत हिने केली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौत यांच्यात तुंबळ शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई केल्यानंतर हा वाद आणखीनच शिगेला पोहोचला होता.
माझ्या शिष्टाईमुळे शिवसेना आणि कंगनामधील वाद मिटला- आठवले
या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले आहे. तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हीडिओ शेअर केला आहे. यामध्ये काही शिवसैनिक एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करत असल्याचा दावा कंगनाने केला आहे. या व्यक्तीने सरकारवर टीका करणारा संदेश पाठवल्याने त्याला मारहाण झाल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.
#SenaAttacksVeteran #Udhavresignnow #CantBlockRepublic pic.twitter.com/a7y0bs6vqr
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 11, 2020
त्यामुळे आता महाराष्ट्रात सत्ता आणि राजकारणापलीकडे जाऊन सामान्य माणसांच्या संवैधानिक हक्कांचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा, अशी मागणी कंगना राणौतने केली आहे.
यापूर्वी पालिकेने पाली हिल येथील अनधिकृत कार्य़ालयावर हातोडा चालवल्यानंतर कंगना राणौत प्रचंड संतापली होती. तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत तुमचा अहंकार धुळीस मिळवेन, असा इशारा दिला होता. यानंतर शिवसेनेच्या सर्व नेत्यांना कंगना प्रकरणावर कोणतेही भाष्य करायचे नाही, असे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. त्याऐवजी शिवसेनेकडून कंगनाची कायदेशीर मार्गाने कोंडी केली जाऊ शकते. त्यामुळे आता कंगना राणौत आणखी किती काळ शिवसेनेविरोधात आक्रमक राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.