मुंबई : सीडीआर प्रकरणी रिझवान सिद्दीकीच्या चौकशीत बॉलिवूडमधलं एक ग्लॅमरस नाव समोर आलं आहे. ते म्हणजे कंगनाचं. कंगनानं रिझवानला एक मेसेज केला. त्या मेसेजवरुन आता नवी चर्चा सुरू झाली आहे. कंगना आणि हृतिक, एक हेट स्टोरी, कंगना आणि हृतिक यांचा वाद थेट कोर्टात गेला आहे. दोघंही ट्विटरवर प्रचंड भांडले आणि आता एकमेकांनी नोटीसही दिली आहे. आता या प्रकरणी नवं वास्तव समोर आलं आहे. सीडीआर प्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी यांची चौकशी झाली. त्यावेळी कंगनानं रिझवानला हृतिकचा मोबाईल नंबर मेसेज केल्याचं समोर आलं आहे.
सीडीआर अर्थात कॉ़ल डेटा रेकॉर्ड, सोप्या भाषेत सांगायचं तर कुणाचं कुणाशी काय बोलणं झालं, त्याचा रेकॉर्ड. घटनेनं दिलेल्या खाजगी आयुष्याच्या अधिकाराच्या कलमानुसार कुणीही कुणाचेही फोन टॅप किंवा रेकॉर्ड करू शकत नाही. फक्त पोलिसांना विशेष परवानगीनंतर तसे सीडीआर उपलब्ध होऊ शकतात. पण असे हे सीडीआर केल्याप्रकरणी प्रसिद्ध वकील रिझवान सिद्दीकी पोलिसांच्या ताब्यात होता. तो हृतिक विरुद्ध कंगनाच्या खटल्यात कंगनाचा वकील होता. त्यामुळे कंगनानं हृतिकचं मोबाईल संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी रिझवानला त्याचा नंबर पाठवला होता की काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्यावर कंगनानं तातडीनं प्रतिक्रिया दिली आहे.
कुठलाही निष्कर्ष काढण्याआधी योग्य तपास व्हायला हवा, असं कंगनानं म्हटलं आहे. जेव्हा आम्ही कोर्टात एखादी नोटीस देतो, त्यावेळी आम्ही संबंधित सगळी सखोल माहिती वकिलाला देतो. ही माहिती एखादा नियम तोडण्यासाठी वापरण्यात आलीय, असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे.
हृतिक आणि कंगनानं एकमेकांसोबत क्रिश 3 आणि काईटस हे चित्रपट एकत्र केले होते. त्याचदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली, आणि दोघांचं अफेअर सुरू झालं, असं बोललं जातं. त्याचदरम्यान हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटाच्या बातम्या यायलाही सुरुवात झाली. हृतिक कंगनाशी लग्नही करणार होता, असा कंगनाचा दावा आहे. पण नंतर दोघांचं बिनसलं आणि त्यानंतर कंगना हृतिकवर आरोप करत सुटली. हृतिकही पुढे आला आणि दोघांनीही ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली.
कंगना-हृतिकचा हा वाद बराच काळ गाजला. आता त्यावरची चर्चा थोडी शांत झाली आहे. त्यातच हृतिक आणि सुझान पुन्हा लग्न करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. त्याचवेळी पुन्हा या सीड़ीआर प्रकरणाच्या संदर्भात कंगनाचं नाव समोर आल्यानं पुन्हा या प्रकरणाला हवा मिळाली आहे.