लोकलमध्ये पोलिसही असुरक्षित! चोरट्याने लांबवलं महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र

Mumbai Local : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल अनेकांच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. याच मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. कल्याणध्ये घटलेल्या या धक्कादायक घटनेनंतर लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आकाश नेटके | Updated: May 5, 2023, 01:20 PM IST
लोकलमध्ये पोलिसही असुरक्षित! चोरट्याने लांबवलं महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र title=

Kalyan Crime : मुंबईची (Mumbai News) लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल ट्रेन (Mumbai Local) अनेकांच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पण गर्दीचा फायदा घेत अनेकजण लुटमार करत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. यासोबत लोकल रेल्वेमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या देखील घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे रेल्वे पोलिसातर्फे (Railway Police) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मात्र आता या लोकलमध्ये पोलीस कर्मचारीच सुरक्षित आहेत की नाही असा सवाल कल्याणमधील (Kalyan) एका घटनेनंतर विचारला जात आहे.

कल्याणध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र लांबवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कल्याण रेल्वे स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलसोबत हा प्रकार घडला होता. दरम्यान या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलने कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने महिला कॉन्स्टेबलच्या गळ्यात हात घालून मंगळसूत्र खेचून काढले. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. काही कळण्याच्या आताच हा सर्व प्रकार घडल्याने महिला कॉन्स्टेबलला आरोपीचा विरोध करता आला नाही.

तक्रार दाखल झाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या मदतीने मंगळसूत्र लांबवणाऱ्या प्रवीण पवार या चोरट्याला अटक केली आहे. प्रवीण पवार हा अंबरनाथमध्ये राहतो. दरम्यान त्याने आणखी चोऱ्या केल्या आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

"3 एप्रिल रोजी सीएसमटी लोकलच्या महिल्या डब्यामध्ये महिला कॉन्स्टेबल प्रवास करीत होती. त्यावेळी एका अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळ काढला होता. या आरोपीचा पोलीस शोध घेत होते. तपासानंतर आरोपीचा शोध घेतल्यानंतर त्याच्याजवळून महिलेचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. आरोपीचे नाव प्रविण पवार असून तो अंबरनाथचा रहिवासी आहे. भादवि कलम 392 नुसार आरोपी प्रविणविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे," अशी माहिती रेल्वे पोलीस अधिकारी पंढरी जाधव यांनी दिली.

लोकल ट्रेनमध्ये जाळण्याचा प्रयत्न

काही महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये धावत्या लोकल ट्रेनमध्ये एका दिव्यांग व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न करण्याता आला होता. आरोपीने नशेसाठी वापरणाऱ्या सोल्युशनने दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये दिव्यांग व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण रेल्वेत शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली ही धक्कादायक घटना घडली होती.