कोल्हापूरातील पूरावेळी भाजपवाले कुठे होते? आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल

चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवावे. 

Updated: Jun 9, 2020, 07:39 PM IST
कोल्हापूरातील पूरावेळी भाजपवाले कुठे होते? आव्हाडांचा भाजपवर हल्लाबोल title=

मुंबई: शरद पवार यांच्या कोकण दौऱ्याला उशीर झाला, अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आपण कोणाबद्दल बोलतोय, याचे भान ठेवावे. साहेबांवर टीका करताना त्यांनी जनाची नाही किमान मनाची लाज तरी बाळगावी, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. 

शरद पवार यांच्या कोकण दौऱ्याला उशीर झाला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. जणूकाही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत. आठवण म्हणून सांगतो... 1972 साली दुष्काळ पडला तेव्हा गावा-गावात पोहचले शरद पवार... 1993 चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार साहेब जागेवर पोहचले. खिल्लारीचा भूकंप झाला... तिथल्या जिल्हाधिका-यांना कळण्याच्या आत पवार साहेब खिल्लारीत पोहचले होते. 

एवढेच काय पण जेव्हा कोल्हापूर मध्ये पूर आला तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते याचा शोध तर घ्यावा. त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब 2 फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

लवकर दौरे करुन नारळाची झाडं उभी केलीत, पवारांचा भाजप नेत्यांना सणसणीत टोला

आपल्या 50 वर्षांच्या कारकर्दितीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार साहेब आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभूतपूर्व काम केल आणि म्हणूनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवले. आपलं हेलिकॉप्टर गारा पडतायेत म्हणून खाली उतरल्यानंतर त्याच अवस्थेत चिखल तुडवत द्राक्षे आणि डाळींबांच्या बागांमध्ये जाणारे शरद पवार साहेबच होते. तेव्हा त्यांना दौ-यावर उशीर झाला असं म्हणणं हे आपलं राजकीय प्रगल्भत्व सिद्ध करते, असा टोला आव्हाडांनी पाटलांना लगावला.

'आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, विदुषक हवाय'; पवारांचा सॉल्लिड प्रतिटोला

आजही कोव्हीड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वत:ला दाराच्या आत न-ठेवता वय वर्षे 80 असतानाही राज्यात काय सुरु आहे, हे पाहण्यासाठी न घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत. आजही सकाळी आठ वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीका आव्हाड यांनी केली.