दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरकारमधले मंत्री जयंत पाटील यांनी निशाणा साधला आहे. भाजपचे नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेकवेळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीवरुन जयंत पाटील यांनी टोला लगावला.
'काही लोक राज्यात राजकारण करत आहेत. महाराष्ट्राचं काहीही होवो, त्यांना राजकारणच करायचं आहे. विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे, काही सूचना असतील तर त्या आम्हाला द्या, आम्ही निश्चित कार्यवाही करू. सारखा राज्यपालांना त्रास देऊ नका. काही म्हणणं असेल तर मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगा. तुमच्या सल्ल्याचं स्वागत असेल,' अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
'राज्यात कोरोनाशी आमचं युद्ध चालू आहे, पण भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणं, सरकार उलथवणं यात जास्त रस आहे. राज्यातील जनतेला कळून चुकलंय की भाजपला राज्यातील संकटात असलेल्या जनतेबद्दल स्वारस्य नाही, त्यांना पुन्हा हे सरकार पाडून महाराष्ट्रात आपलं सरकार आणणं किंवा राष्ट्रपती राजवट आणण्यात रस आहे', असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.
स्थलांतरित मजुरांची प्रचंड हेळसांड, शेतमाल खरेदी न करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या,गरिबांना रेशनधान्य न मिळणे, आरोग्यव्यवस्था पूर्णतः कोलमडली असणे, रुग्णसंख्या लपविणे, मृतदेहांबाबत प्रोटोकॉलचे पालन न करणे अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. pic.twitter.com/q8ks0d8NlO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 19, 2020
राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती.