'अजूनही फसवता का?' IAS अश्विनी भिडेंसोबत ब्रिटीश एअरवेजमध्ये धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्यासोबत ब्रिटीश एअरवेजच्या विमानात धक्कादायक प्रकार घडला आहे. अश्विनी भिडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

आकाश नेटके | Updated: Jan 15, 2024, 12:12 PM IST
'अजूनही फसवता का?' IAS अश्विनी भिडेंसोबत ब्रिटीश एअरवेजमध्ये धक्कादायक प्रकार title=

Ashwini Bhide Slams British Airways : युनायटेड किंगडमची एअरलाइन कंपनी ब्रिटीश एअरवेजने मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची माफी मागितली आहे. आयएएस अश्विनी भिडे यांना ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने प्रवास करताना वाईट अनुभव आला होता. फ्लाइटशी संबंधित तक्रार त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपस्थित केला होती. त्यानंतर ब्रिटीश एअरवेजने अश्विनी भिडे यांची माफी मागितली आहे. आयएएस अश्विनी भिडे यांची सोशल मीडिया पोस्ट सध्या व्हायरल होत असल्याने ब्रिटीश एअरवेजवर टीका केली जात आहे.

ब्रिटिश एअरवेजने ओव्हरबुकिंग्सचं कारण देत अश्विनी भिडे यांनी प्रीमियम क्लास सीटचं बुकिंग केलेलं असूनही त्यांना इकोनॉमी क्लासमधून प्रवास करायला लावला. त्यामुळे अश्विनी भिडे संतापल्या आणि त्यांनी सोशल मीडियावर ब्रिटिश एअरवेजविरोधातील आपला संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिश एअरवेजच्या प्रवाशांना असे अनुभव नेहमीच येतात, असाही दावा अश्विनी भिडे यांनी दावा केला आहे. ओव्हरबुकिंगच्या खोट्या बहाण्याने चेक-इनच्या वेळी त्यांना प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये डाउनग्रेड करण्यात आल्याचे अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे.

"ब्रिटिश एअरवेज, तुम्ही लोकांची फसवणूक, भेदभाव किंवा वर्णद्वेष करता का? कुठलीही भरपाई न देता ओव्हबुकिंग्सच्या खोट्या सबबी सांगून चेक इन काउंटरवर प्रीमियम इकोनॉमी तिकीट काढलेल्या प्रवाशाला ऐनवेळी इकोनॉमी सीटवरून प्रवास करायला लावता. ब्रिटिश एअरवेज प्रवाशांबरोबर नेहमी अशीच वागते का? तुम्ही डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन करता असं ऐकलं होतं, मला यावेळी ते पहिल्यांदाच जाणवलं. नुकसान भरपाई बद्दल विसरलात? मला सांगण्यात आले आहे की ब्रिटिश एअरवेजची ही एक सामान्य प्रथा आहे," असे अश्विनी भिडे यांनी म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकारानंतर अश्विनी भिडे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे ब्रिटिश एअरवेजची तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर ब्रिटीश एअरवेजने माफी मागितली आहे. जे घडले ते ऐकून आम्हाला दुःख झाले आणि झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे ब्रिटीश एअरवेजने म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आणि एअरलाइनच्या कृतीबद्दल निंदा केली.

दरम्यान, अश्विनी भिडे यांच्या पोस्टला उत्तर देताना, इतर अनेक नेटकऱ्यांनीही एअरलाइन कंपनीकडून मिळालेल्या वाईट वागणुकीची तक्रार केली आहे. "मी पाहिले की मी वगळता इतर सर्व प्रवाशांकडे ब्लँकेट होते. मी ब्रिटिश एअरवेजकडे तक्रार केली, कोणतीही कारवाई झाली नाही, असे एका युजरने म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने 'मी एकदा ब्रिटीश एअरवेजने प्रवास केला होता. ते वाईट आणि वर्णद्वेषी आहेत. कर्मचारी अनादर करणारे आहेत आणि मूलभूत सौजन्याचा अभाव आहे. पुन्हा कधीही उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला आहे,' असे म्हटलं आहे.