स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट

ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी होतेय

Updated: Aug 14, 2019, 10:38 PM IST
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट title=

बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. चाळीस हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा मुंबईत पहारा आहे. मुंबईकरांनाही सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबई कायमच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलीय. नुकताच काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आलंय. त्यामुळं चवताळलेले दहशतवादी देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीय. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कसून तपासणी होतेय. मुंबईच्या रक्षणासाठी ४० हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा खडा पहारा आहे. शीघ्र कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्यात. विमानतळ आणि रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

सुरक्षा यंत्रणांनी मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपुर काळजी घेतलीय. आता मुंबईकरांनीही सतर्क राहून मुंबईला अधिक सुरक्षित ठेवावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.