दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याकडून निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. २००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असल्याचे समजते.
'राज्यसभेत आजपर्यंत असे कधीच घडले नव्हते; उपसभापतींबद्दलचा माझा अंदाज चुकला'
याबाबत शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत भाष्यही केले. त्यांनी म्हटले की, सुप्रियालाही काल संध्याकाळी नोटीस येणार होती. मात्र, पहिली नोटीस मलाच आली, हे चांगले झाले. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून आयकर विभागाने ही नोटीस पाठवल्याचे मला समजले. संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे, याचा मला आनंद असल्याची खोचक टिप्पणी यावेळी पवार यांनी केली. तसेच आपण या नोटिसला लवकरात लवकर उत्तर देऊ, असेही पवारांनी स्पष्ट केले. कारण वेळेत उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, असा उल्लेखही संबंधित नोटीसमध्ये असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
'शिवसेना, राष्ट्रवादीने पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध करावा'
तत्पूर्वी शरद पवार यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत राज्यसभेत कृषी विधेयकांना घाईगडबडीत देण्यात आलेल्या मंजुरीवर टीका केली. कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या आग्रहामुळे ही विधेयके तातडीने मंजूर करण्यात आली. त्यासाठी सदनाचे कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला. आजवर राज्यसभेत असे कधीच घडले नव्हते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली.