गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई : आम्ही झी २४ तासवर स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा सर्वात मोठा पर्दाफाश करणार आहोत. सेलिब्रिटीज आणि बेड्या धेडांची पोरं ड्रग्ज, गांजाची तस्करी करतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र मुंबईतल्या गल्ली बोळांत, चाळी आणि सोसायट्यांमध्ये हेच ड्रग्ज किती सहजपणे विकलं जातं. पेडलर्स कोणतीही भिडभाड न बाळगता हे सर्रासपणे कशी तस्करी करतात याचा पर्दाफाश करणार आहोत. (in mumbai various places sting operation of drugs selling)
मुंबई, मायानगरी मुंबई आणि या मायानगरीतल्या या झोपडपट्ट्या आता ड्रग्ज तस्करांचे अड्डे बनलेत. बडेबडे सेलिब्रिटी, गर्भश्रीमंत धेंडं ही ड्रग्जची गिऱ्हाईकं.पण या धंद्याला खतपाणी घातलं जातं ते झोपडपट्ट्यांमधल्या या गल्लीबोळातच.
झी 24 तासनं ड्रग्जचा हा गंदा धंदा शोधून काढण्यासाठी मोर्चा वळवला तो या गल्लीबोळातच. या मोहिमेत आमच्यासोबत सामील होते ते मानखुर्द शिवाजीनगर भागातले मनसेचे स्थानिक पदाधिकारी जगदीश खांडेकर. त्यांना सोबत घेऊन ड्रग्ज अड्ड्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
या गल्ल्यांमध्येच आम्हाला बिलाल भेटला. तोंडाला फडका गुंडाळलेला बिलाल हा ड्रग पेडलर. याला ना पोलिसांची भीती आहे. ना हा कुणाला घाबरतो. त्याला थोडंसं ड्रग्जबाबत विचारताच त्यानं भर रस्त्यावर खुलेआम आमच्याशी ड्रग्जचा सौदा सुरू केला.
आम्ही थोडा इंटरेस्ट दाखवल्यावर बिलालला खात्री ड्रग्जच्या व्यवहाराची पटली. त्यानं थेट आम्हाला जिथं सगळा माल ठेवला होता, तिथं राजरोसपणे नेलं. गल्ली बोळातच उघड्यावर सुरू झाली ड्रग्ज खरेदीची सौदेबाजी.
सहजपणे झोपडपट्ट्यांमध्ये ड्रग्ज मिळतंय ते. फक्त एकच अट की तुमच्याकडे पैसा असायला हवा. मग वाट्टेल तो माल वाट्टेल तेवढा तुम्हाला मिळालाच समजा.
त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर खुलेआम मिळणारं हे ड्रग्ज तुमच्या मुलांच्या हातातही सहज पडू शकतं. त्यांचा पॉकेटमनी कधी या पेडलर्सच्या खिशात जाणार ते तुम्हाला कळणारही नाही. कारण या ड्रग्जचे रेटही पेडलर खुलेआम सांगतात.
एमडी – सगळ्यात महाग आणि पॉवरफुल ड्रग्ज... 1800 रूपयांना एक बुक मिळते... एक बुक म्हणजे साधारण 1 ग्रॅम सफेद पावडर...
चरस – 1000 रूपयांना एक अंटा मिळतो... एक अंटा म्हणजे 3 ते 4 ग्रॅमची गोळी असते...
गांजा – 100 ते 150 रूपयांना गांजाची पुडी मिळते
कोको – 250 रूपयांना एक बॉटल मिळते.. खोकल्यावरचं बॅन असलेलं हे औषध... डॉक्टरांच्या प्रिस्क्रिपनशिवाय आणि कुठल्याही मेडिकलमध्ये ते सहज उपलब्ध नाही
बटन – म्हणजे गुंगी आणणा-या गोळ्या... 150 रुपयांना सहा गोळ्यांची स्ट्रिप मिळते... कधी कधी 10 गोळ्याही दिल्या जातात.. या गोळ्या घेतल्या की, माणूस दिवसभर धुंदीत असतो...
मिनार – 60 रूपयांना मिनारचा 4 गोळ्यांचा बंच मिळतो. या गोळ्यांनीही नशा चढते...
मुंबईतल्या सगळ्यात बकाल अशा टॉपच्या झोपडपट्टयामंध्ये हा ड्रग्जचा धंदा बिनधास्तपणे सुरू आहे. केवळ मानखुर्दचं लल्लूभाई कंपाऊंडच नव्हे तर गोवंडी, शिवाजीनगर, बैंगनवाडी, आणि डंपींग ग्राऊंड परिसर, चेंबूरची वाशीनाका वसाहत, कुर्ला झोपडपट्टी, अंधेरीतील नवरंग सिनेमामागची झोपडपट्टी, बांद्रा बहिरामपाडा आणि कुलाब्याच्या कफ परेड परिसरातही बऱ्याच ठिकाणी खुले आम ड्रग्ज विक्री होते.
तुम्हाला जागं करणं, हा आमचा ड्रग्ज मिळणारी ठिकाणं आणि त्यांचे रेट दाखवण्यामागील एकच उद्देश आहे. आम्ही या कुठल्याही धंद्याचं समर्थन करीत नाही आणि याला प्रोत्साहनही देत नाही. फक्त या सगळ्या ड्रग्जच्या कचाट्यात तुमची आमची मुलं सापडू नयेत आणि समाजातील विघातक प्रवृत्तीला आळा घालणं हाच या स्टींग ऑपरेशनचा उद्देश होता.
या स्टिंग ऑपरेशनमधून ड्रग्जचं सेवन करणं किंवा तस्करीला प्रोत्साहन देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. तर गल्ली बोळात सहज उपलब्ध होणारं हे ड्रग्ज तुमच्या मुलांच्या हातात किती सहजपणे पडू शकतं याचं विदारक वास्तव दाखवत आहोत. केवळ पालकांना आणि पोलीस प्रशानाला जागं करण्यासाठी आम्ही हे मुंबईतल्या ड्रग्ज तस्करीचं वास्तव दाखवत आहोत.