मुंबई : ओखी चक्रीवादळाचा परिणाम पुढले २४ तास असेल. त्यानुसार संध्याकाळी मुंबईत जोरदार वाऱ्यासह काही भागात पाऊस अपेक्षित आहे.
तसचं किनारपट्टीवर २ ते ६ किलोमीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तवली आहे.
ओखी वादळ मुंबईपासून ६९० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपर्यंत येईपर्यंत ओखीची तीव्रता कमी झालेली असेल. तरीही ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मच्छिमारांनी काळजी घेण्याची आवाहन करण्यात आलं आहे.
ओखीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तर उत्तर कोकण तसंच उत्तर मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
गुजरातलाही ओखी चक्रीवादळामुळे पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पुढल्या ४८ तासांनंतर महाराष्ट्र आणि मुंबईवरचा चक्रीवादळाचा प्रभाव कमी होईल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेनं दिलीय.