मुंबई : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांना भरमसाठी वीजबिले आलीत. याबाबत ग्राहकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात होती. वीजबिले (Electricity bill) माफ करण्याची मागणी अनेक राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, कोणाचीच वीजबिले ९Electricity bill) रद्द करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, आता तातडीने वीज बिल थकबाकी वसुली करण्याबाबत महावितरणचे (MSEDCL) आदेश जारी केले आहेत. जर तुम्ही वीजबिल भरले नाही तर थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत होणार आहे.
वीजबिल थकबाकीची वसुली तातडीनं करण्याचे आदेश महावितरणने आपल्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. सोबतच थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेशही दिले गेले आहेत. डिसेंबर 2020 अखेर राज्यात 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर कोणताच पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यांमध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिली आहे. थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णयही महावितरणने घेतला आहे. महावितरणच्या या वीज बिल वसुली सक्तीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.