मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे उर्मिला मातोंडकर यांनी सांगितले.
तत्पूर्वी आज सकाळपासून उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. उर्मिला यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यामुळे उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करू शकतात, असे सांगितले जात होते.
उर्मिला यांनी गेल्याच आठवड्यात काँग्रेसला रामराम केला होता. लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवासाठी काँग्रेसमधीलच काही नेते कारणीभूत असल्याची तक्रारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून तत्कालीन मुंबई प्रदेशाध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे केली होती. त्यांच्या टीकेचा रोख संजय निरुपम यांच्याकडे होता.
मात्र, उर्मिला यांनी लिहलेल्या गोपनीय पत्रातील माहिती बाहेर फुटली होती. या सगळ्यावरून बरेच राजकारण झाले होते. यामुळे उर्मिला मातोंडकर काँग्रेसवर प्रचंड नाराज होत्या. अखेर याच कारणामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम केला होता.
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उर्मिला मातोंडकर यांना अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यांचा प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. सुरुवातीला उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टी यांच्यापुढे निभाव लागणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र, उर्मिला यांची राजकीय जाण अत्यंत प्रगल्भ असल्याचे लक्षात आल्यानंतर उत्तर मुंबईतील प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत आली होती.