आमदार निवासाची जागा झोपड्यांसाठी दिल्याची अफवा, पत्रे, बांबू घेऊन शेकडो नागरिकांची धाव

आमदार निवासस्थानाच्या भूखंडावर झोपडपट्टीदादांचा डोळा 

Updated: Jul 6, 2022, 07:46 PM IST
आमदार निवासाची जागा झोपड्यांसाठी दिल्याची अफवा, पत्रे, बांबू घेऊन शेकडो नागरिकांची धाव title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : 'आपले आमदार राहूल नार्वेकरसाहेब आता विधानसभा अध्यक्ष झालेत. त्यामुळे मनोरा आमदार निवासस्थानाचा मोकळा भूखंड गरीबांना झोपड्या बांधण्यासासाठी दिलाय' अशी अफवा आज कफ परेडमध्ये उठली आणि एकच गोंधळ निर्माण झाला,

झोपडपट्टीतील शेकडो नागरीक बांबू, काठ्या, ताडपत्री घेवून त्या भूखंडावर पोहचले. प्रत्येकजण मिळेल ती जागा निवडून आपले साहित्य टाकू लागला. जशी बातमी सगळीकडं पसरू लागली तशी गर्दी वाढू लागली. काही वेळातच शेकडो लोकं या मोकळ्या भूखंडावर पोहोचले.

पण जेव्हा पोलिासांना ही माहिती समजली. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर पळवून लावलं. ही केवळ अफवा असल्याचं पोलिसांनी लोकांना समजावून सांगितलं.

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आलं असून त्याजागी नवं टोलेजंग आमदार निवासस्थान बांधलं जाणार आहे. सध्या हा भूखंड मोकळा असल्यानं झोपडपट्टी दादांचा त्यावर डोळा आहे. स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष यांनाही आपल्या नावाचा वापर करून लोक भूखंडावर अतिक्रमण करत असल्याचं समजताच त्यांनीही पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितलं. 

सध्या कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये आमदार निवासस्थानाच्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे.