शिवाजीपार्कवर लतादीदींचं स्मारक व्हावं का? यावर काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर

लतादीदींचं स्मारक शिवाजीपार्कवर व्हावं की नको, यावर पहिल्यांदाच बोलले मंगेशकर कुटुंब, पहा काय बोलले हृदयनाथ मंगेशकर

Updated: Feb 10, 2022, 09:54 PM IST
शिवाजीपार्कवर लतादीदींचं स्मारक व्हावं का? यावर काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर title=

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं ६ फेब्रुवारीला निधन झालं.  निधनानंतर दिवसही लोटला नाही तोच त्यांच्या स्मारकावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे.  दादरच्या (Dadar) ज्या शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं लता मंगेशकर यांचं स्मारक बनवावं अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी केली होती.

यावर आता स्वत: मंगेशकर कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  लतादीदींचं स्मारक शिवाजीपार्कवर व्हावं की नको, यावर पहिल्यांदाच हृदयनाथ मंगेशकर (Hridaynath Mangeshkar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

काय म्हणाले हृदयनाथ मंगेशकर
शिवाजी पार्क हे क्रीडा उद्यान आहे, या उद्यानात लतादीदींचं स्मारक होऊ नये, महाराष्ट्र सरकार लता मंगेशकर संगीत विद्यालयाच्या रुपाने जे करतंय, तेच खरं स्मारक आहे, लतादीदी या साक्षात श्रद्धामूर्ती असल्याने संगीताची श्रद्धा वाहणं महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली आहे.

संगीत महाविद्यालय शासन बांधतंय, हेच खरं स्मारक आहे, त्यात संगीताचे सर्व प्रकार होणार आहेत, जे संगीत यूग होतं, संगीत पर्व होतं, त्या संगीतातून श्रद्धांजली देणं आवश्यक आहे.  स्मारक मुंबईत व्हावं, मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात घोषणा केलेली आहे त्यामुळे स्मारकावरून राजकीय वाद नको असं हृदयनाथ मंगेशकर यांनी म्हंटलंय. 

मुंबईत होणार संगीत महाविद्यालय
मुंबईत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने एक भव्य संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. मुंबईतील कलिना कॅम्पससमोरील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 3 एकर जागेवर हे महाविद्यालय उभारलं जाणार आहे. 

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचं दिदींचं स्वप्न होतं. पण वेळेत जागा उपबल्ध न झाल्याने त्यावेळी ते होऊ शकलं नाही. यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्याच समितीने या महाविद्यालयाचं नाव लता दीनानाथ मंगेशकर ठेवण्याचा प्रस्ताव दिला. 

संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास, विकास, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी सुसज्ज आणि अत्याधुनिका सोयी सुविधांनी युक्त असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं संगीत महाविद्याल स्थापन करण्याचं लता मंगेशकर यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे.