दीपक भातुसे, मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन इथे आयोजित तबलिगी जमातीच्या कार्यक्रमावरून देशातील वातावरण ढवळून निघालं असतानाच झालेल्या सर्व प्रकाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करत मोदी सरकारला याप्रकरणी टार्गेट केलं आहे. या मुद्यावर आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार आणि भाजप असं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
निजामुद्दीने इथल्या तबलिगी मरकज कार्यक्रमाला हजर राहिलेल्यांमुळे देशातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यातील अनेक जण महाराष्ट्रातीलही आहेत. निजामुद्दीनहून परत आल्यानंतर या सर्वांनी समोर येऊन आपली आरोग्य तपासणी करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं होतं. मात्र यातील ५० ते ६० जण अद्याप फरार असून त्यांनी आपले मोबाईल फोन बंद केल्याने त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिली होती. त्यानंतर आज देशमुख यांनी तबलिगी जमातीशी संबंधित एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकात त्यांनी थेट केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले असून तबलिगींशी केंद्र सरकारचा संबंध असल्याचा थेट आरोप केलाय. त्याचबरोबर तबलिगींमुळे सुरू असलेल्या कोरोनाच्या प्रसाराला केंद्र सरकार जबाबदार असल्याचाही अप्रत्यक्ष आरोप देशमुख यांनी केला आहे.
मुंबईजवळील वसई येथे १५ व १६ मार्च रोजी ५० हजार तबलिगी जमणार होते. मात्र महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने त्याला परवानगी नाकारली, अशी या पत्रकाची सुरुवात करून देशमुख यांनी पुढील प्रश्न केंद्र सरकारला विचारले आहेत.
1) केंद्रात गृह मंत्रालयाने निजामुद्दीने इथे तबलिगी मरकजच्या इज्तेमाच्या आयोजनाला परवानगी का दिली ?
2) निजामुद्दीन मरकजच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असं असूनही या आयोजनाला का थांबवलं नाही ? यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का ?
3) ज्या पद्धतीने या मरकजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यांमध्ये झाला, याकरिता केंद्रीय गृह मंत्रालय जबाबदार नाही का ?
4) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना रात्री दोन वाजता मरकजमध्ये का आणि कोणी पाठवले ? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचे आहे की दिल्ली पोलीस आयुक्तांचे ?
5) अजित दोवाल व तबलिगीचे पुढारी मौलाना साब रात्री दोन वाजता मरकजमध्ये अशी काय गुप्त मंत्रणा करत होते ?
6) अजित दोवाल व दिल्ली पोलीस आयुक्त दोघांनी या विषयावर बोलायचे का टाळले ?
7) अजित दोवाल यांना भेटल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मौलाना साब कुठे फरार झाले ? आता ते कुठे आहेत ?
8) कोणाशी यांचे संबंध आहेत ???
असे प्रश्न उपस्थित करत अनिल देशमुख यांनी या पत्रकाच्या शेवटी म्हटलं आहे की,
1) मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमची, 2) कार्यक्रमाला रोखलं नाही तुम्ही, 3) तबलिगींशी संबंध तुमचे
या सर्व प्रश्नांची उत्तरं कोण देणार ?
अनिल देशमुख यांच्या या प्रश्नांचा रोख थेट केंद्र सरकारकडे असून तबलिगींचे केंद्र सरकारशी म्हणजेच भाजपशी संबंध असल्याचा थेट आरोप त्यांनी यात केलाय. त्यामुळे यावरून राजकारण तापणार आहे.