होळी पौर्णिमेला सुपरमूनचे दर्शन

आज होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आपल्याला सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.  

Updated: Mar 21, 2019, 12:00 AM IST
होळी पौर्णिमेला सुपरमूनचे दर्शन  title=

मुंबई : आज होळी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्यानं आपल्याला सुपरमूनचे दर्शन होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. या दशकातलं हे अखेरचं सुपरमून दर्शन असणार आहे. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर आहे. पौर्णिमेच्या दिवशी जर चंद्र पृथ्वीच्या जवळ येत असेल, तर चंद्रबिंब चौदा टक्के मोठं आणि तीस टक्के जास्त प्रकाशित दिसते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ ३ लाख ५९ हजार ३७७ किलोमीटर अंतरावर येणार आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र संध्याकाळी ६ वाजून १३ मिनिटांनी पूर्व क्षितीजावर उगवून गुरुवारी सकाळी ७ वाजून १ मिनिटांनी पश्चिमेला मावळणार आहे. 

यापूर्वी १९ मार्च २०११ रोजी होळी पौर्णिमा आणि सुपरमून असा योग आला होता. त्यानंतर आज हा योग आला आहे. त्यानंतर नऊ वर्षांनी १० मार्च २०२८ रोजी पुन्हा होळी पौर्णिमा आणि सुपरमून दर्शनाचा योग येणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंदा होळी पौर्णिमा, सुपरमून दर्शन आणि विषूवदिन असा तिहेरी योग आला आहे. या दिवशी सूर्य विषुववृत्तावर येणार असल्याने, पृथ्वीवर सर्वत्र दिनमान आणि रात्रीमान समान असणार आहे. नंतर सूर्य उत्तरगोलार्धात प्रवेश करील. या दिवसाला 'विषुवदिन' असं म्हणतात.