अलर्ट: पुढच्या दोन दिवसात पाऊस धक्कातंत्राच्या तयारीत!

राज्यभरात सुरू असलेला पावसाचा कहर पुढचे आणखी दोन दिवस चालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवतानाच नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 30, 2017, 05:11 PM IST
अलर्ट: पुढच्या दोन दिवसात पाऊस धक्कातंत्राच्या तयारीत! title=

मुंबई : राज्यभरात सुरू असलेला पावसाचा कहर पुढचे आणखी दोन दिवस चालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवतानाच नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

एकाच वेळी कोलमडलेली रेल्वे आणि रस्ते वाहतूक, निचरा न झाल्याने रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे मुंबईकरांचे झालेले पाणी पाणी यांमुळे एकट्या मुंबईवरच पावसाने आपली घागर रिकामी केल्याचे चित्र निर्माण झाले खरे. प्रत्यक्षात मात्र बुधवारी (२९ ऑगस्ट) राज्याच्या उर्वरीत भागालाही पावसाने चांगलेच झोडपले होते. राज्यातील अनेक भागात पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती होती. दरम्यान, हिच परिस्थिती पुढचे किमान दोन दिवस कायम असू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे. 

दरम्यान, रत्नागिरी, सिधुदुर्गसह संपूर्ण कोकण, मुंबई, नवी मुंबई, मुंबईची सर्व उपनगरे तसेच, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्तर मध्य महाराष्ट्रातही हिच स्थिती असून,  नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन नागरिकांनी सतर्क रहावे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने असा अंदाज नोंदवला असला तरी, स्कायमेटने किमान आज (बुधवार,३० ऑगस्ट) तरी मुंबईकरांची मुसळधार पावसापासून सुटका होऊ शकते, असे म्हटले आहे. स्कायमेट ही खासगी संस्था आहे. मुसळधार पावसासाठी आवश्यक असणारी  नैसर्गिक स्थिती सध्यातरी नाही. त्यामुळे मुंबईकरांवरचे मुसळधार पावसाचे संकट काही अंशी टळले आहे. मात्र, हलक्या ते मध्यम पावसाला मुंबईकरांना तोंड द्यावे लागू शकते असा स्कायमेटचा अंदाज आहे.