मुंबई: मुंबईसह उपनगरात आणि राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढचे 48 तासांसाठी दोन विभागात अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या 48 तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
के एस होसाळीकर यांनी ट्वीटरवर दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची आणि वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे सहीत अनेक भागांमध्ये 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असून बळीराजा सुखावला आहे. मधल्या टप्यात पाऊस गायब झाला होता, त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा काहीसा चिंतेत होता. अखेर दडी दिलेल्या पावसाने हजेरी लावत बळीराजाला धीर दिला आहे. पण दुसरीकडे जिल्ह्यातील धरण 100 टक्के भरल्याने नद्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात तीव्र (depression) होण्याची व वेस्ट-नॉर्थवेस्ट दिशेने येत्या २,३ दिवसात सरकण्याची शक्यता आज IMD ने वर्तवली. परिणामी राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी मुसळधार-अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे सहीत (१२-१४) pic.twitter.com/pFuwMLE6eC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 11, 2021
काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस आणि नदीचं पाणी वाढल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. उभी राहिलेली पिक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. जून आणि जुलै महिन्यांत बऱ्यापैकी पडलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात मुंबईसह महाराष्ट्राकडे पाठ फिरविली होती. मात्र, आता सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला असतानाच हवामान खात्याने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.