मुंबई : ST कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी तीन पोलीस ठाण्यांचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी मुंबईतल्या गिरगाव कोर्टात अर्ज केला असताना आता मुंबईच्या गावदेवी पोलिसांनीही सदावर्तेंची कोठडी मागितली आहे. नवीन आरोप ठेवण्यात आल्यामुळे तपासासाठी गावदेवी पोलिसांना 4 ते 5 दिवसांची कोठडी हवी आहे. त्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरतही कोर्टात आले आहेत.
दुसरीकडे सदावर्तेंनीही कोल्हापूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावरील सुनावणी 21 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
अॅड गुणरत्न सदावर्तेंच्या घरामध्ये नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याचं विशेष सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी गिरगाव कोर्टात सांगितलं आहे. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सदावर्तेंची पुन्हा कोठडी मागितली आहे. त्यावर सुनावणीत सरकारी वकिलांनी नवी माहिती समोर ठेवली.
नोटा मोजण्याच्या मशिनमधून 85 लाख रुपये मोजले गेल्याचं ते म्हणाले. याखेरीज त्यांच्या घरात अनेक संशयास्पद कागदपत्रं आढलली असून त्याच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात आलीये. याखेरीज कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनीही कोठडी मागितली आहे.
उद्या सदावर्तेंना कोर्टात हजर केलं जाणार असून कोठडी कुणाला मिळणार, याचा निर्णय होईल. दरम्यान, अन्य 3 आरोपींना आज न्यायालयानं 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिलीये.
ST कर्मचा-यांची वकिली करताना गुणरत्न सदावर्तेंनी प्रचंड माया जमवल्याचा आरोप झालाय. त्यांची कोठडी मागण्यासाठी झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी नवी माहिती दिली. यात सदावर्तेंच्या घरात चक्क नोटा मोजण्याचं मशीनच सापडल्याचा दावा केले गेला आहे.
सरकारी वकिलांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार अॅड सदावर्ते यांनी ST कर्मचा-यांकडून पैसे गोळा करून परळ, भायखळा इथं मालमत्ता खरेदी केल्या आहेत. भायखळ्यात त्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वी एक गाळा विकत घेतलाय. त्यावर सदावर्तेंची मुलगी झेन, सदावर्ते, पत्नी जयश्री पाटील अशा सगळ्यांची नावं आहेत.