राज्यपालांची कलम ३५६ नुसार राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

राज्यपालांनी मात्र ट्विट करून दिली माहिती

Updated: Nov 12, 2019, 03:51 PM IST
राज्यपालांची कलम ३५६ नुसार राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस title=

मुंबई : आपल्याला राजभवानाकडून राष्ट्रपती राजवटीची कोणत्याही प्रकारे शिफारस करण्यात आलेली नसल्याचं सांगितलंय, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक असं म्हणत असले तरी राज्यपालांनी मात्र ट्विट करून 'राष्ट्रपती राजवटीची शिफारस सूचित करणारं पत्र पाठवण्यात आल्याचं' स्पष्ट केलंय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार केंद्रीय गृहमंत्रालयाला अहवाल सादर केल्याची माहिती राजभवनानं दिलीय. राज्यपालांनी घटनेच्या कलम ३५६ नुसार अहवाल सादर केलाय. 


राज्यपालांचं राष्ट्रपतींना पत्र

दरम्यान, थोड्याच वेळापू्र्वी राष्ट्रवादीचे नेते यांनी वेगळीच माहिती दिल्याचं समोर आलं. आपण राजभवनाशी संपर्क साधला असता राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयी आपण शिफारस केली नसल्याचं राजभवनातून आपल्याल सांगण्यात आलं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. 
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांना निर्णयाचे सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत. मात्र काँग्रेसच्य़ा ज्येष्ठ नेत्यांसोबत आज बैठक आहे. या बैठकीत काँग्रेससोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नबाव मलिक यांनी दिलीय. तर आघाडीच्या बैठकीनंतरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय होणार असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. 

महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. निकाल लागून २० वा दिवस उजाडला तरी महाराष्ट्रातील सरकार स्थापनेचा घोळ संपलेला नाही. कोणत्याही एका पक्षाकडं किंवा आघाडीकडं पुरेसं बहुमत नसल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होणार असल्यानं, राज्यपालांच्या शिफारशीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली. त्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय.