1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर

Goregaon Mulund Link Road: गोरेगावहून मुलुंड हे अतंर आता कमी होणार आहे. अवघ्या 15 मिनिटांत आता गोरेगावहून मुलुंडला पोहोचणे शक्य होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 5, 2024, 03:08 PM IST
1 तासाचे अंतर 20 मिनिटांत पूर्ण होणार; गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता ठरणार गेमचेंजर  title=
goregaon mulund link road tunnel work progress

Goregaon Mulund Link Road: मुंबईतील वाहतुक सुरळीत होण्यासाठी व वाहतुककोंडी फोडण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात उड्डाणपुल व मेट्रोचे निर्माण करण्यात येत आहे. प्रशासनाने गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या जोडरस्त्यामुळं वाहनचालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई महापालिकेने कार्यादेश दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचा प्राथमिक सर्व्हे सुरू आहे. कसा असेल हा प्रकल्प आणि त्याची वैशिष्ट्य, जाणून घेऊया. 

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात दोन जुळे बोगदे असणार आहेत. या दोन भुयारी बोगद्याच्या कामाला सुरुवातदेखील झाली आहे. गोरेगाव पूर्व येथून 4.70 किमी लांबीचे दोन जुळे बोगदे असणार आहेत. देशातील सर्वाधिक लांबीचे हे बोगदे असणार आहेत. विशेष म्हणजे, या दोन भुयारी मार्ग हे संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या खालूनही जाणार आहेत. कमीत कमी 20 ते 25 मीटर आणि जास्तीत जास्त 100 मीटर खोलीवर या बोगद्याचे काम होणार आहे. 

तिसऱ्या टप्प्यात दोन बोगद्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे दोन्ही भुयारी मार्गात तीन मार्गिका असणार आहेत. संजय गांधी अभयारण्याच्या डोंगराखालून हा एक भुयारी मार्ग जाणार आहे. 4.7 किमीचा भुयारी रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचा अभयारण्याला कोणताही धोका नसणार आहे.  

गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत जोडरस्त्याच्या रुंदीकरणाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. 1.26 किमी लांबीचा उड्डाणपूल, खिंडीपाडा, तानसा जलवाहिनी ते नाहूर येथील रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलापर्यंत 1.89 किमी लांबीचा उड्डाणपूलाचे कामही पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी 12 हजार 13 कोटी रुपयांचा खर्च आहे. तर महापालिकेच्या 2024-25च्या अर्थसंकल्पात 1 हजार 870 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा सुमारे 12.20 किमी लांबीचा आहे.

मुलुंड-गोरेगाव जोड रस्त्यामुळं पूर्व आणि पश्चिम उपनगरातील ही दोन शहरे जोडली जाणार आहेत. लिंक रोडवरुन मुलुंड -ठाणेपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागायचा. त्यातही वाहतुककोंडी असल्यास प्रवासाचा वेळ वाढतो. मात्र, या जोड रस्त्यामुळं प्रवासाचा वेळ वाढणार आहे. गोरेगाव ते मुलुंड हा प्रवास 15 ते 20 मिनिटांत पू्र्ण होणार आहे. तर बोगद्यातून पाच ते दहा मिनिटांत प्रवास पूर्ण होणार आहे.