मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीत इतक्या घरांसाठी लॉटरी निघणार

म्हाडाची दिवाळी भेट, पाहा कोणत्या गटात किती घरे असणार उपलब्ध  

Updated: Jun 2, 2022, 06:35 PM IST
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, दिवाळीत इतक्या घरांसाठी लॉटरी निघणार title=

मुंबई :  मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्यानं अनेकांना हे स्वप्न धुसर वाटतं. मात्र, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) म्हणजेच म्हाडामुळे (Mhada) अनेकांचं स्वप्न सत्यात उतरलं आहे.

आता पुन्हा एकाद म्हाडाने मुंबईकरांना दिवाळी भेट दिली आहे. दिवाळीत म्हाडाच्या तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. 

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय 'पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील. यावेळी म्हाडाचे सर्व  प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल'

दिवाळीत 3000 घरांची सोडत 
पहाडी गोरेगावमध्ये 23 मजली अशा सात इमारती उभारल्या जाणार आहेत. पहाडी गोरेगाव इथं अत्यल्प गटासाठी 1239 घरांचा समावेश असणार आहे.  घराचं क्षेत्रफळ 322.60 चौरस फूट इतकं असेल.

अत्यल्प गट-  इमारती 4,  घरे  736
अल्प गट - -इमारती 4, घरे -708
मध्यम  उत्पन्न गट-  इमारत 1,  घरे 227 
उच्च उत्पन्न गट-  इमारत 1, घरे 105

वार्षित उत्पन्न मर्यादा वाढवली

दरम्यान, म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील घरांच्या सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात आलीय.  गृहनिर्माण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय जारी केलाय. म्हाडा सोडतीत अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च असे उत्पन्न गट आहेत. या उत्पन्न गटासाठी विशिष्ट उत्पन्न मर्यादाही निश्चित करण्यात आलीय. या उत्पन्न मर्यादेनुसार इच्छुकांना सोडतीत अर्ज भरत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करता येतं. 

उत्पन्न मर्यादेनुसारच अर्ज भरणं अत्यंत आवश्यक असते. आतापर्यंत अत्यल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार रुपयांपर्यंत, अल्प गटासाठी प्रति महिना 25 हजार ते  50 हजार रुपयांपर्यंत, मध्यम गटासाठी प्रति महिना 50 हजार ते 75 रुपये आणि उच्च गटासाठी रुपये 75 हजाराच्या पुढे अशी उत्पन्न मर्यादा होती. आता यात बदल करत ही उत्पन्न मर्यादा वाढविण्यात आलीय.

नव्या बदलानुसार आता प्रत्येक गटासाठी आता वार्षिक उत्पन्न मर्यादा वाढवण्यात त्यानुसार
अत्यल्प गट - वार्षिक 6,00,000 रुपये
अल्प गट - वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
मध्यम गट - वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
उच्च गट - वार्षिक 12,00,001  ते 18,00,000 रुपये