Lalbaug Bhartmata Cinema: लालबागच्या रस्त्यांवर सध्या गणेशभक्तांची अलोट गर्दी आहे. परळचा राजा, मुंबईचा राजा, तेजुकाया मेन्शनचा गणपती, नरेपार्कचा राजा, लालबागचा राजाचे लाखो भक्त येथील रस्त्यांवर आपल्या बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. तुम्ही इथले स्थानिक नसाल आणि या गर्दीत असाल तर एका कोपऱ्यात लालबाग-परळचा वारसा सांगणारे भारतामाता चित्रपटगृह नक्की पाहिले असेल. आता हे चित्रपटगृह बंद असले तरी कधीकाळी येथे सिनेमा पाहण्यासाठी रांगा लागायच्या. टाळ्या, शिट्टयांचा आवाज अगदी बाहेरपर्यंत यायचा. अनेक मराठी सिनेमांना या चित्रपटगृहाने डोक्यावर घेतलंय. लालबाग परळच्या कामगार वर्गातील प्रेक्षकांना मराठी थिएटरात जाऊन सिनेमा पाहण्याची गोडी या वास्तून लावलीय. एकिकडे बाप्पाचे विसर्जन होत असताना भारतमाताच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
लालबाग-परळमध्ये राहणाऱ्या चित्रपटप्रेमींसाठी भारतमाता एक जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. आता कितीही मल्टीप्लेक्स, अद्ययावत थिएटर आले असले तरी नव्वदीच्या दशकापर्यंत टाळ्या, शिट्या वाजवत सिनेमा पाहण्याची मज्जा काही औरच होती, ही लालबागची पिढी नक्की सांगेल. दक्षिण मुंबईत राहणाऱ्या जुन्या पिढीतील व्यक्तींनी भारतमाता चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला नसेल असे फार कमीजणच असतील. या सिनेमागृहात कामगार वर्गाची खूप मोठी गर्दी असे. भारतामाता सिनेमागृह हे अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे साक्षीदार आहे. दादा कोंडके यांच्या सिनेमाचे पोस्टर्स नेहमी लक्ष वेधून घेत असतं. पण गेल्या काही वर्षात भारतमाता चित्रपटगृह बंद पडले. यामुळे लालबाग-परळमधील जनतेचा हिरमोड झाला होता.
भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरु करावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. भारतमाता सिनेमागृहात जाऊन चित्रपट पाहणं हे आता स्वप्नच राहतंय का? अशी शंका येऊ लागली. दरम्यान तमाम चित्रपट रसिकांसाठी आंनदाची बातमी येत आहे. भारतमाता चित्रपटगृह पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. 'बॉलिवूड हंगामा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
कोरोना काळात भारतमाता चित्रपटगृह पूर्णपणे बंद पडलं. यानंतर चार वर्षानंतरही चित्रपटगृहाचे दार कधी उघडणार? याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत. आता चित्रपटगृह सुरु होण्याला दिवाळीचा मुहूर्त सापडला आहे. 'मुक्ता ए2 सिनेमाज'च्या सहकार्याने भारतमाता चित्रपटगृहाची सुरुवात होणार आहे.
भारतमाता चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे. आवश्यक असलेल्या विविध परवानग्या घेतल्या जात आहेत. भारतमाता चित्रपटगृहाच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इतर कामे पूर्ण होण्यास 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती भारतमाताचे व्यवस्थापकीय भागीदार कपिल भोपटकर यांनी माध्यमांना दिली.
भारतमाता चित्रपटगृहातील प्लास्टरचे काम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चित्रपटगृहातील खुर्च्या, लादी, रंग, एसी, ध्वनी यंत्रणा आणि इतर कामे या 3 महिन्यात होतील असे सांगण्यात येत आहे. असे असले तरी सिनेमागृहाच्या मूळ वास्तूत कोणताही मोठा बदल केला जाणार नाही. हेरिटेज वास्तूंच्या यादीत असलेल्या भारतमाताचे वेगळेपण जपले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.