कृष्णात पाटील, मुंबई : मुंबईच्या विलेपार्लेतील मागील तीन वर्षापासून रखडलेले गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम अखेर पूर्ण झाले आहे. येत्या पावसांत हे पंपिंग स्टेशन सुरु केले जाणार असल्याने जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ या परिसरातील रहिवाशांची पाणी तुंबण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे. आठ पंपिंग स्टेशन पैकी आतापर्यंत पाच पंपिंग स्टेशन सुरु झाली आहेत. विलेपार्लेतील सहावे गझदरबांध पंपिंग स्टेशनच्या कामाला २०१४ साली सुरुवात झाली. हे काम २०१६ साली पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र तीन वर्ष काम रखडले.
कंत्राटदाराला ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ मिळाली. मात्र कंपनीला निधी अभावी कर्ज मिळवण्यात अडचणी निर्णाण झाल्याने काम रखडले होते. मुदतीत काम न झाल्याने कंत्राटदाराला पालिकेने दंड ठोठावला. गझदरबंध पंपिंग स्टेशन ३१ मे पर्यंत कार्यान्वित केले जाईल असे प्रशासनाने जाहीर केले होते. त्यानंतर पावसाच्या पार्श्वभूमीवर ९ जूनची डेडलाईनही दिली. मात्र यावेळीही गझदरबंध पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे काम काढून घेऊन दुस-या कंत्राटदार कंपनीची नियुक्ती करण्यात आली.
काम वेळेत पूर्ण न करणा-या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आले. दरम्यान, तीन वर्ष रखडलेले हे काम आता पूर्ण झाले असून येत्या पावसांत कार्यान्वित केले जाणार आहे. या पंपिंग स्टेशनच्या कामाला १२५ कोटी खर्च करण्यात आला आहे.
कार्यान्वित झालेले पम्पिंग स्टेशन्स - खर्च
हाजीअली पम्पिंग स्टेशन : १०० कोटी
इर्ला पम्पिंग स्टेशन : ९० कोटी
लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन : १०२ कोटी
क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशन : ११६ कोटी
ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन : १२० कोटी
गझदर बंद पंपिंग स्टेशन : १२५ कोटी