गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?

 ७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते.  हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते  भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 04:58 PM IST
गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात?  title=

मुंबई :  ७ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गेली कित्येक महिने भाविक गणेशोत्सवाची वाट पाहत होते.  हा उत्सव उत्साहात साजरा केल्यानंतर आज गौरी - गणपतीचा निरोप घेतला जाणार आहे. आपल्याला यथाशक्तीने बाप्पासाठी जे जे करता येईल ते  भाविक अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत असतो. 
 
काही जणांकडे बाप्पा ११ दिवस म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत विराजमान होतात.  त्या दिवशी देखील प्रत्येक भाविक अगदी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतो. अनेकदा लहान मुलं बाप्पाला सोडून जाण्यास नकार देतात. अगदी रडून ते आपल्या लाडक्या गणूला निरोप देतात. अशावेळी त्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. आपण बाप्पाला निरोप का देतो? किंवा गणरायाचे विसर्जन पाण्यातच का करतात? या प्रश्नांचं उत्तर आपण जाणून घेऊया.... 

सर्व देव देवतांमध्ये गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. कोणतेही शुभ कार्य करताना प्रथम गणेशपूजा केली जाते. गणेशोत्सवानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करतात. असे करण्यामागे काय कारण आहे हे समजून घेऊ या... गणपती हा बुद्धीचा देव आहे. माणसाची बुद्धी कुशाग्र असेल तर कामात अडचणी येत नाहीत. अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करता येते. हे विश्व पाच महाभूतांनी मिळून बनले आहे. या पाच तत्त्वांपैकी एक तत्त्व आहे जल. जलाचा अधिपती आहे गणपती. माणसाच्या मेंदूचा अधिकांश भाग तरल आहे, असे विज्ञानानेही मान्य केले आहे. त्यामुळेच गणपतीला बुद्धीची देवता मानण्यात येते व गणपतीचे विसर्जन पाण्यात करतात. गणपतीचा निवास पाण्यात असतो, अशी मान्यता आहे.

मनुष्याची उत्पत्तीही जलापासूनच झाली आहे. भगवंताचा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. हा अवतार पाण्यात जन्मास आला. त्यामुळे मानवी संस्कृतीत जलाला पूज्य स्थान आहे. भगवान गणपती जल तत्त्वाची अधिपती देवता आहे. त्यामुळे गणपतीला प्रथम पूज्य मानण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यात करण्यामागेही हेच कारण आहे.

गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे ?
अध्यात्मशास्त्रानुसार गणेश चतुर्थीच्या काळात केलेल्या शास्त्रोक्त पूजाविधींमुळे मूर्तीत श्री गणपतीचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. मूर्ती पाण्यात विसर्जित केल्याने हे चैतन्य पाण्याद्वारे सर्वदूर पसरते. पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने हे चैतन्य वातावरणाद्वारेही दूरपर्यंत पोहोचते. पूजेतील निर्माल्यामध्येही चैतन्य आलेले असल्यामुळे निर्माल्य वहात्या जलस्रोतात विसर्जित करावा. असे केल्याने निर्माल्यातील चैतन्यही सर्वदूर पसरते. बाप्पाला निरोप देणं प्रत्येकालाच कठीण असतं. अगदी १० दिवस आपल्या घरी कुटुंबातील एक सदस्य म्हणून आपण त्याच्याशी वागत असतो. आपल्या मनातील भावना, प्रत्येक गोष्ट आपण ज्या बाप्पाशी शेअर करतो. आज त्याला निरोप द्यायचा हे कठिण आहे. पण आपल्याला विश्वास आहे. पुढच्या वर्षी बाप्पा येणार असून त्याचं वास्तव्य खूप दिवस असणार आहे.

२०१८ मध्ये अधिक मास असल्यामुळे बाप्पा तब्बल १९ दिवस उशीरा येणार आहे. त्यामुळे भाविकांना पुढल्यावर्षी अधिक वाट बघावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात १३ तारखेला म्हणजे गुरूवारी बाप्पा विराजमान होणार आहे.