Ganesh Chaturthi 2020 : गणरायाच्या स्थापनेसाठी मुहूर्त

गणेशोत्सवाच्या काळात सर्व नियम आवर्जून पाळावे 

Updated: Aug 20, 2020, 01:58 PM IST
Ganesh Chaturthi 2020 : गणरायाच्या स्थापनेसाठी मुहूर्त  title=

मुंबई : २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५६ मिनिटांपर्यंत मध्यान्हकाली श्रीगणेशमूर्ती स्थापना करावी असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

या विषयी अधिक माहिती देतांना श्री. सोमण म्हणाले की ज्यांना या वेळेत गणेशस्थापना करता येणार नाही त्यांनी त्यादिवशी पहाटे पाच पासून दुपारी तीन वाजेपर्यंत गणेशस्थापना केली तरी चालेल.

यावर्षी कोरोनाची साथ आहे. सर्वांनी गणेशोत्सव साधेपणाने पण मोठ्या उत्साहाने साजरा करावा. कोरोना प्रतिबंधक उपाय व शिस्त यांचे कसोशीने पालन करावे. गणेशमूर्ती आकाराने लहान आणि मातीची असावी. स्वत:  माती आणून जमेलतशी गणेशमूर्ती तयार केली तरी चालेल. 

गणेशपूजनासाठी जेवढे साहित्य उपलब्ध होईल तेवढे वापरावे. जे नसेल त्याजागी अक्षता अर्पण कराव्या. गणेशपूजेसाठी पुरोहित  नसतील तर पुस्तकावरून किंवा ऑनलाईन ऍप वापरून पूजा करावी.कोरोना संकटामुळे गणेशदर्शनासाठी यावर्षी शक्यतो आप्तेष्ट-मित्राना बोलवू नये. त्याऐवजी त्यांना ऑनलाईन ॲपवरून पूजेमध्ये, आरतीच्यावेळी, अथर्वशीर्ष म्हणताना सामील करून घ्यावे.

गणेशमूर्तींचे  विसर्जन घरीच स्वच्छ पाण्याने भरलेल्या बादलीत करावे. कृत्रिम तलावाचा वापर करावा. गर्दी करू नये. यावर्षी मंगळवार २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ५८ मिनिटांनंतर गौरी आणावयाच्या आहेत. बुधवार २६ ऑगस्ट रोजी गौरीपूजन आहे. गुरुवार २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३६मिनिटांनंतर गौरी विसर्जन करायचे आहे. 

यावर्षी मंगळवार  १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. पुढच्यावर्षी गणपतीबाप्पाचे आगमन उशीरा म्हणजे शुक्रवार १० सप्टेंबर २०२१ रोजी होणार असल्याचेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.