मुंबईतील मूर्तीकाराची किमया; साकारला टिश्यू पेपरचा बाप्पा

वजनाने हलका, तितकाच रेखीव आणि देखणा बाप्पा तुमची वाट पाहतोय...   

Updated: Aug 26, 2019, 10:28 AM IST
मुंबईतील मूर्तीकाराची किमया; साकारला टिश्यू पेपरचा बाप्पा title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे आणि गणेश चित्र शाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे , तर पर्यावरण पूरक गणेश मूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ज्या गणेश मूर्तींचे वजन ८ ते १० किलो आहे त्याच मूर्ती आता फक्त काही ग्राम मध्ये उपलब्ध होत आहेत, त्यामुळे अशा पर्यावरण पूरक मूर्तींच्या मागणीत विलक्षण वाढ झाली आहे.  

ह्या मुलांनी हातात घेतलेल्या मूर्तीचे वजन ८ ते १० किलो च्या वर नसून फक्त काही ग्राम वजनाची मूर्ती बनवली आहे. मातीच्या गणेशमूर्तीचं वजन सहसा किलोंच्या घरात असतं. पण पर्यावरण पूरक मूर्ती ही अवघ्या काही ग्रॅममध्ये उपलब्ध आहे. घाटकोपर येथील मूर्तिकार संतोष धुरी यांनी कागदाच्या लगड्या पासून अशाक काही विलोभनीय आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. या मूर्ती साकारताना मूर्तीचं वजन कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी टिश्यू पेपर पासून गणेश मूर्ती साकारली. या गणेश मूर्तीचं वजन फक्त २०० ग्राम पासून ते १ किलो पर्यंत आहे. 

कागदी लगद्यापासून तयार झाल्यामुळे आणि या संपूर्म प्रक्रियेत कोणतंही रसायन न वापरल्याने ती पर्यावरणपूरक ठरत आहे. 

हे तसं आव्हानच... 

कागदी लगद्यापासून विशेष म्हणजे टिश्यू पेपरपासून साकारल्या जाणाऱ्या मूर्ती साकारण्याचं काम तसं अवघड. अशा प्रकारची एक मूर्ती साकारण्यासाठी जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. 

मूर्ती साकारण्याच्या या प्रक्रियेत प्रथम टिश्यू पेपर भिजवत ठेवला जातो नंतर त्याच्या लगद्यात गम/ गोंद  टाकून तो लगदा साच्यात सुकवण्यासाठी ठेवला जातो. नंतर त्यावर इतर सोपस्कार आणि रंग काम केलं जातं. पावसाचं प्रमाम जास्त असल्याच हवेतील गारव्यामुळे या प्रकारच्या मूर्ती सुकण्यासाठी काहीसा जास्त वेळ घेतात.  मात्र सद्यस्थिती पाहता या मूर्त्यांना मागणी जास्त असून गणेश भक्तही वजनाने हलक्या आणि तितक्याच कलात्मक अशा या देखण्या मूर्तीलाच पसंती देत आहेत. फक्त मुंबईतच नव्हे, तर मुंबईहून आपल्या गावीदेखील गणेश भक्त या वजनाने हलक्या असणाऱ्या गणेशमूर्ती नेत आहेत.

संस्कृती आणि निसर्ग एकाच वेळी जपा... 

गणेश मूर्तींचा हा नवा आणि पर्यावरणस्नेही अंदाज सर्वांनाच मुख्य म्हणजे सृष्टीरचेत्या त्या बाप्पालाही नक्कीच भावला असणार यात शंका नाही. कारण, संस्कृती जपताना, सण साजरा केले जात असताना आपल्या कोणत्याही कृतींमळे  निसर्गाला धोका पोहचता कामा नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे. याकरता अनेकजण पुढे येत आहे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.  त्यामुळे खऱ्या अर्थाने यंदाचा बाप्पा हा पर्यावरणस्नेही... असंच म्हणावं लागेल.