विजय हिवरे, झी मीडिया, मुंबई : कॅन्सरवरच्या उपचारांसाठी बहुतांश रुग्ण मुंबई गाठतात. आधीच मानसिक ताण, त्यात उपचारांचा खर्च या सगळ्याच्या काळजीत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असतात, त्यावेळी त्यांच्यासाठी देवदूत म्हणून उभी राहते 'गाडगे मिशन धर्मशाळा'
मयूर गव्हाळे... नुकतंच त्याच्या डोळ्याच्या कर्करोगावरची शस्त्रक्रिया झालीय. मयूरसारखे असे अनेक जण रोज कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबई गाठतात... मग या महागड्या मुंबईत राहायचं कुठे? हा प्रश्न आ वासून उभा राहतो... आणि त्याचवेळी मोठा आधार देते मुंबईतल्या दादर या मध्यवर्ती भागातली गाडगे 'बाबा मिशन धर्मशाळा'... १९८४ पासून कँसरग्रस्त रूग्णांसाठी निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था ही धर्मशाळा करतेय आणि तीही अवघ्या ४० रुपयांमध्ये... यामध्ये दोन वेळचं जेवण, नाश्ता आणि रुग्णांना फळं द्यावी लागतात... खोली हवी असेल तर दिवसाला फक्त दीडशे रुपये द्यावे लागतात... टाटा हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी वाहनांची सोयही या धर्मशाळेनं केलीय.
टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सहा -सहा महिने रुग्णालयात राहावं लागतं. बासुदेव साहू आणि बिंदू साहू या दाम्पत्याला कॅन्सरनं ग्रासलंय. ते सहा महिन्यांपासून या धर्मशाळेत वास्तव्याला आहेत. सुरुवातीला गाडगे बाबा धर्मशाळा पाच मजल्यांची होती. पण रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत महापालिका आणि राज्य सरकारनं अजून दोन मजल्यांची परवानगी दिली... सध्या या धर्मशाळेत साडे सातशे लोक राहू शकतात.
गेल्या कित्येक वर्षापासून ही संस्था रुग्णांची अविरत सेवा करतेय. अशा या दगडी वास्तू मुंबईचं आपलेपण आणखी अधोरेखित करतात.