फेसबुकवरून मैत्री महागात, प्रेमाचे नाटक करत त्याने घातला 8 लाखांना गंडा

 Facebook Cheating : नायगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेला फेसबुकवरून मैत्री (Facebook Friendship) करणे चांगलेच महागात पडले आहे.  

Updated: Jan 1, 2022, 02:12 PM IST
फेसबुकवरून मैत्री महागात, प्रेमाचे नाटक करत त्याने घातला 8 लाखांना गंडा title=

प्रथमेश तावडे, वसई :  Facebook Cheating : नायगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेला फेसबुकवरून मैत्री (Facebook Friendship) करणे चांगलेच महागात पडले आहे. आरोपीने या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला तब्बल आठ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

नवीन मदनलाल डोगरा (34) असे या गंडा घालणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो हरियाणा येथील अंबाला परिसरात राहणारा आहे. पीडित महिला ही घटस्फोटित असून तिला 10 वर्षांचा मुलगा आहे. 2010 मध्ये तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून आरोपी नवीन सोबत झाली होती. बरेच वर्ष त्यांमध्ये नेहमी सारखे संभाषण सुरू होते. ही महिला मोठ्या पगाराची नोकरी करीत असल्याने पैशासाठी आरोपीने या महिलेला आपल्या पहिल्या विवाहाची माहिती न देता प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

त्यानुसार 2018 मध्ये आरोपी विनीत हा या महिलेला भेटण्यासाठी नायगाव येथील तिच्या राहत्या घरी आला होता. यावेळी त्याने जबरदस्तीने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास विरोध केला असता आरोपी हा तिच्याशी लग्न करण्याचे आमिष देत होता. पीडित महिलाही निराधार असल्याने आपला आणि मुलाच्या भविष्याचा विचार करून तिने आरोपीशी लग्न करायचे ठरविले. लग्नाचे आमिष दाखवत त्याने महिलेशी वारंवार शरिरसंबंध प्रस्थापित केले होते. आरोपी हा प्रेमाचा विश्वास संपादन करून बनाव रचण्यात यशस्वी झाला होता. 

प्रेमाचे नाटक करत त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. तो तिच्याकडे अधूनमधून पैस्यांची मागणी करत होता. काही काळाने त्याने महिलेला व्यवसायात नुकसान झाल्याचे सांगून तिच्याकडून मदतीची मागणी केली. त्यानुसार महिलेने तिच्याजवळ असलेले जवळपास आठ लाखांचे सोने विकून आरोपीला पैसे दिले होते.

कोरोना काळात महिलेची नोकरी सुटल्यानंतर त्याने पुन्हा पैशाची मागणी केली होती. मात्र महिलेकडे पैसेच नसल्याने तिने नकार दिला. मात्र त्यानंतर आरोपीने महिलेचे फोन उचलायचे बंद केले. महिलेने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला असता त्याने तिच्याकडे नोकरी आणि बँक बॅलन्स नसल्याने महिलेशी संबंध ठेवण्यास नकार दिला. 

या दरम्यान पीडित महिलेला आरोपी नवीन डोगरा याचे लग्न झाल्याचे कळले. पैशासाठी आरोपीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.