Free Kashmir : देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांचा जोरदार टोला

 'फ्री काश्मीर' (Free Kashmir)  पोस्टरवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Updated: Jan 7, 2020, 01:51 PM IST
Free Kashmir : देवेंद्र फडणवीस यांना जयंत पाटील यांचा जोरदार टोला title=

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथे एका मराठी तरुणीने 'फ्री काश्मीर' (Free Kashmir) असे पोष्टर हातात घेतले. याच पोस्टरवरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ठाकरे सरकारला जबाबदार धरले. त्यानंतर याला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या दोघांमध्ये ट्विटर वॉर दिसून आले आहे. 'फ्री काश्मीर'च्या घोषणा कशासाठी? फडणवीसांचा सवाल तर सत्ता गेल्याने ताबा सुटलाय, अशी टीका जयंत पाटील यांनी फडणवीसांवर केली. जयंत पाटील यांना प्रत्युत्तर देताना म्हटले, काश्मीरबाबत देवेंद्रजी हे वक्तव्य तुमच्याकडून अपेक्षित नाही, जबाबदार व्यक्ती असे कसं काय म्हणून शकते, असे जयंत पाटील यांनी फडणवीस यांना चांगलेच सुनावले. 

Image

ती मराठी मुलगी

गेट-वे ऑफ इंडियाजवळच्या आंदोलनातलं फ्री काश्मीरचं पोस्टर  आणि  ते पोस्टर धरून उभी राहणारी मुलगी राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलीचे नाव मेहक प्रभू (Mehak Mirza Prabhu) असून ती काश्मीरी वगैरे नव्हे तर मराठी आहे. मुंबईत जन्मलेली आणि वाढलेल्या मेहकने 'फ्री काश्मीर'चं पोस्टर का दाखवले यावर तिचे स्पष्टीकरण पुढे आले आहे. आम्ही लोकशाही देशात राहतो. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला लोकशाहीत स्वातंत्र्य आहे. काश्मीरमधील जनतेला लोकशाहीत बंधने किंवा निर्बंध नकोत. त्यांना लोकशाहीचे स्वातंत्र्य हवे. तेथील इंटरनेट आणि मोबाईल सेवा सुरु करण्यात यावी, यासाठीच आपण 'फ्री काश्मीर'चे पोस्टर दाखवले.

काय म्हणालेत देवेंद्र?

दरम्यान, 'काश्मीर फलक'चा हाच धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. हे आंदोलन नक्की कशासाठी आहे? 'Free Kashmir' चा नारा कशासाठी? मुंबईत अशा फुटीरतवादी घटकांना आपण सहनच कसे करु शकतो? मंत्रालयापासून अवघ्या काही अंतरावर 'Free Kashmir' चे नारे दिले जातात. उद्धवजी तुमच्या नाकाखाली 'Free Kashmir' देशद्रोही मोहीम सुरु आहे. हे तुम्ही खपवून घेणार का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे या सगळ्यावर काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोमय्यांची पोलिसात तक्रार

गेट-वे ऑफ इंडियाजवळील आंदोलनात फ्री काश्मीरच्या पोस्टरवरून भाजप-शिवसेनेत जोरदार वाद पेटलाय. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी याबाबत कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. तसेच गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'काश्मीर को चाहिए आझादी'च्या घोषणांना प्रोत्साहन दिल्याचा आरोपही सोमय्यांनी केला. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचा दावा सोमय्यांनी केलाय. याबाबत पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्याची माहितीही सोमय्यांनी दिलीय. तर फ्री काश्मीर म्हणजे काश्मीरमधील निर्बंध हटवा असा त्याचा अर्थ असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. तर फ्री काश्मीर पोस्टर झळकवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संग्राम यांनी सांगितले.