मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांना पक्षात प्रवेश देऊन शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिलाय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे निवेदिता माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मायेचा ओलावा फक्त शिवसेनेत मिळतो, असे यावेळी उद्धव म्हणालेत. दरम्यान, आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने आपण हा प्रवेश केला. मी आता स्वगृही परत आलेय, असे प्रवेशानंतर निवेदिता माने म्हणाल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातमध्ये दुर्लक्ष होऊ लागल्याने आपल्या अस्तित्वाचा प्रश्न होता. त्यामुळे मी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. आज प्रवेशाचा कार्यक्रम देखणा, सुंदर होता. माझ्या मनापासून शुभेच्छा असणार आहेत. शिवसेनेला भरभराट आणण्यासाठी प्रयत्न करू, असे निवेदिता माने म्हणाल्यात. हातकणंगले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या खासदार होत्या. उद्धव ठाकरे यांनी निवेदिता माने यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. यावेळी एकनाथ शिंदे, मनोहर जोशी, संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत होते.
निवेदिता माने यांच्या आरोपात तथ्य नाही, राष्ट्रवादीने सगळे दिले - अजित पवार
फक्त दोन मिनिटांत उद्धव ठाकरे यांनी धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता राजू शेट्टी बॅकफूटवर गेलेत. धैर्यशील, राजू शेट्टींना त्यांची जागा दाखवणार, असा स्पष्ट इशारा त्यांनी राजू शेट्टी पर्यायाने राष्ट्रवादीला दिलाय. माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने हे राष्ट्रवादी पक्षांकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघरातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादी पक्षाने हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना सोडण्याची तयारी दाखवल्यामुळं माने गट नाराज होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात आघाडीचे प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची बोलणी सुरु आहेत. तसेच आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टी यांना खासदारकी द्यायची असा विचार असल्याचे वृत्त असल्याचे समजताच निवेदिता माने नाराज झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा धैर्यशील याने आधीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्याही सेनेत जातील असे बोलले जात होते.