Mumbai News : तुम्हालाही ताटात मासे किंवा माशांपासून तयार केलेला एखादा पदार्थ दिल्यास चार घास जास्त खाल्ले जातात असं वाटतं? ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची. कारण, लहरी वातावरणाच्या धर्तीवर एकिकडे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे प्रभावित झालेला असताना आता ऋतूबदलही यात भर टाकताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच मान्सूनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र/ मुंबई गेटवे ते मांडवा अशी बोटसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर आता मासेविक्रीवरही या पावसाचा परिणाम दिसून येत आहे. हवामान बदलामुळं महागलेली मासळी येत्या काही महिन्यांमध्ये फार कमी प्रमाणातच बाजारांमद्ये विकली जाणार आहे. .
एकिकडे भरमसाट दरवाढ झालेली असतानाच आता पावसाळा तोंडावर असल्यामुळं दरवर्षीप्रमाणं यंदाही खोल समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं नियमित मासे खाणाऱ्यांना ताज्या मासळीसाठी किमान तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार रत्नागिरीतील समुद्रातील मासेमारी गुरुवारपासून बंद राहणार आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारी होणार नाही.
पावसाच्या दिवसात समुद्र खवळलेला असण्यासोबतच पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांचा प्रजानन काळ असतो. या कालावधीत मत्स्य संरक्षण होण्यासाठी मासेमारी न करण्याचा निर्णय मच्छीमार संघटनांकडून घेचला जातो. ज्याचे परिणाम म्हणजे सुक्या मासळीची दरवाढ. पावसाच्या दिवसांमध्ये कोळी बांधवांची मोठी गलबतं खोल समुद्रात सोडली जात नाहीत. उलटपक्षी समुद्रकिनाऱ्यानजीकच्या पट्ट्यात किंवा खाडी भागात मात्र मासेमारी थोड्याथोडक्या प्रमाणात सुरु असल्याचं पाहायला मिळतं.
थोडक्यात पावसाच्या दिवसांत तुम्हाला मासळी खायची इच्छा झालीच तर, मुंबईतील मंडळींनी ट्रॉम्बे कोळीवाडा मार्केट, वरळी मच्छी मार्केट, भोईवाडा मार्केट, वडाळा मच्छी मार्केट, माहीम मासळीबाजार, भाऊचा धक्का, कुलाबा मच्छी मार्केट, उलवे बाजार, शिरवणे मच्छी मार्केट या छोट्या बाजारांना भेट दिल्यास त्यांना तिथं खाडीची मासळी उपलब्ध होऊ शकते. एखाद्या सामारंभासाठी किंवा तत्सम कारणासाठी तुम्हाला मासे खरेदी करायचे झाल्यास ससून डॉकमध्ये तुम्ही मासे खरेदीसाठी जाऊ शकता. इथे कोलकाता आणि गुजरातहून आलेली बर्फात ठेवलेली मासळी तुम्हाला विकली जाईल.