तुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू

तुमच्या आमच्या आरोग्याशी जुळलेली सर्वात मोठी बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनचा सुळसुळाट तरुणाच्या मृत्यूने झाला घोटाळा उघड

Updated: Jan 9, 2023, 09:56 PM IST
तुमच्या आरोग्याशी संबंधीत धक्कादायक बातमी, मुंबईत बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू title=

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : आता तुमच्या आमच्या आरोग्याशी (Health) जुळलेली सर्वात मोठी बातमी पाहूयात. राज्यात बनावट इंजेक्शनचं (Bogus injection) रॅकेट सुरू असल्याचा पर्दाफाश झालाय. मुंबईतल्या प्रतिथयश सैफी रुग्णालयातल्या (Saifi Hospital) मेडिकल स्टोअरमधल्या (Medical Store) बनावट इंजेक्शनमुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उघड झालीय. याबाबत एफडीएनं (FDA) कारवाई केली असून सैफी हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरचालक आणि पुरवठादारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे या बोगस इंजेक्शनची पाळंमुळं मुंबईच्या बाहेरही खोलवर रुजली असून ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि दिल्लीपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे बोगस इंजेक्शन विकणाऱ्या राज्यातल्या इतरही 11 मेडिकल स्टोअर्सविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

बनावट इंजेक्शनमुळे तरुणाचा मृत्यू
रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याने एक तरुण मुंबईतील सैफी रुग्णलात दाखल झाला होता. त्याला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं.  पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या तरुणाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचं एफडीएच्या चौकशीत उघड झालं. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाइकांनी एफडीएकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने कारवाई केली. 

ही कारवाई 10 ते 11 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये एफडीएने रुग्णालयातील 'ओरोफर इंजेक्शन'चा (Orofer Injection) साठ्याची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेला या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. तसंच जप्त केलेल्या इंजेक्शनचे काही नमुने एफडीएने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत (Laboratory in Pune) पाठविले.

हे ही वाचा : 'मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही...' चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन

राज्यभरात बनवाट इंजेक्शनचं जाळं
इंजेक्शनवर बनावट लेबल, पत्रकाचा वापर करून फसवणूक केल्याचा अंदाज एफडिएने वर्तवला आहे. बनावट इंजेक्शनचं जाळं मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद तसंच दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यानुसार, या भागातील 11 मेडिकल, पुरवठादारांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान सैफी हॉस्पिटलचीही बाजू ऐकून घेतली असून हॉस्पिटल जर यात दोषी आढळलं तर त्यांच्याविरोधातही कारवाई करणार असल्याचं अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी झी २४ तासला दिलीय.