फेसबुक प्रेम करायला शिकवणार...पण गुपचूप गुपचूप

आता खास प्रेमवीरांसाठी फेसबुक एक नवा कप्पा उघडतंय.

Updated: May 2, 2018, 09:08 PM IST

मुंबई : कोण कुठे पिकनिकला गेलं, कुणी कुणासोबत कुठला सिनेमा पाहिला, तुमचे मित्र मैत्रिणी कुठल्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. या सगळ्याची खडान खडा माहिती तुम्हाला फेसबुक देत असतं. आता फेसबुकनं एक पाऊल पुढे टाकलंय. फेसबुक आता तुम्हाला प्रेम करायला शिकवणार आहे. तुमच्या एका क्लिकवर असलेलं फेसबुक आता तुम्हाला प्रेम करण्याची संधी देणार आहे. अर्थात आतापर्यंत फेसबुकवर ओळख होऊन अनेकांची शुभमंगल झाली आहेत.पण आता खास प्रेमवीरांसाठी फेसबुक एक नवा कप्पा उघडतंय. फेसबुक आता डेटिंग फीचर लॉन्च करतं आहे. या फीचरच्या मदतीनं नवे मित्र मैत्रिणी जमवून त्यांच्यावर प्रेम करणं शक्य होणार आहे. 

फेसबुकच्या डेटिंग फीचरमध्ये जाऊन तुम्हाला अनलॉक करायचंय.
त्यासाठी तुम्ही फक्त तुमचं पहिलं नाव टाकलंत तरी चालेल.
तुम्ही जर डेटिंगचा पर्याय निवडलात, तर तुमची डेटिंगची प्रोफाईल तुमच्या फ्रेंडसना दिसणार नाही.
फेसबुककडे आधीच तुमचा डेटा साठवलेला आहे.
त्या डेटाच्या आधारे फेसबुक तुम्हाला डेटिंग पार्टनर शोधून देणार आहे. 
तुम्ही अनलॉक केलंत की तुम्हाला इतरांच्या प्रोफाईल्स पाहता येणार आहेत.
त्यानंतर पार्टनरशी तुम्हाला स्पेशल इनबॉक्सच्या मदतीनं संवाद साधता येणार आहे.
यावर्षी फेसबुकचं डेटिंग फीचर सुरू होणार आहे. 
फेसबुक डेटिंगच्या मदतीनं आयुष्यभराची नाती जोडा, असं फेसबुक सांगतंय

डेटिंगसाठी बऱ्याच सोशल साईटस उपलब्ध आहेत. त्यामध्ये सध्या टिंडर ही अव्वल डेटिंग साईट म्हणून ओळखली जाते. पण फेसबुकनं डेटिंग फीचरची घोषणा केल्यावर टिंडरचे शेअर्स 17 टक्क्यांनी पडले. पण फेसबुक त्याची सोशल साईट आणि डेटिंग फीचर यामध्ये योग्य अंतर ठेवणार आहे का, हा डेटिंगसाठी उत्सुक असणा-यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण डेटिंग फीचरची घोषणा करुन फेसबुकनं सोशल साईटसच्या मार्केटमध्ये खळबळ उडवून दिलीय आणि प्रेमासाठी नवे मित्र मैत्रिणी शोधणा-यांसाठी नवं आभाळ खुलं केलंय.