विशाल सवने, झी मीडिया, मुंबई : (Loksabha Election 2024) लोकसभा निवडणुकीच्या निकालात (NCP) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले आहेत. पक्ष फुटलेला असताना, हातात कोणतीच रस नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दाखवून दिले आहे की आपण मुठभर असलो तरी लाखांना भारी पडू शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या या यशात शरद पवार हे नक्कीच चेहरा होते, नक्कीच त्यांच्या बाजूने सहानुभूतीची एक लाट होती. पण या सहानुभूतीचे मतांमध्ये परिवर्तन करणे गरजेचे होते. समोरच्या बाजूकडे सत्ता, एजन्सीस, वारेमाप पैसा असताना हे काम मोठे जिकरीचे होते पण हा विडा उचलला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी. आणि मग काय, अचूक नियोजन करून टप्प्यात कार्यक्रम करणार नाही ते जयंत पाटील कसले ?
'जब जहाज डुबने लगता है तो सबसे पहले चुहे भागते है।' अशी हिंदीत म्हण आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कथेत ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. साल होतं 2019 चं, ईडी, आयटी, सीबीआय या संस्थांच्या कारवाईच्या भीतीने राष्ट्रवादीतील अनेक नेते ही बुडणारी नवका सोडून भाजपात प्रवेश करत होते. राष्ट्रवादीला एकामागोमाग एक धक्के बसत होते. अशात या बुडत्या नवकेचा कॅप्टन होण्याचा मान मिळाला होता तो इस्लामपूरच्या जयंत पाटील यांना... 1997 साली जेम्स कॅमरुन यांनी जगातील सर्वात मोठ्या 'टायटॅनिक' जहाजावर चित्रपट दिग्दर्शित केला होता. एका भल्या मोठ्या ग्लेशियरला आदळून ज्यावेळी जहाज बुडू लागतं आणि लोक सैरावैरा पळत असतात तेव्हा कॅमरुन यांनी जहाजवरील कॅप्टनचा सीन अचूक टिपला आहे. ज्यात काही क्षणात आपलं जहाज आपल्या डोळ्यादेखत जलसमाधी घेणार याचे दुःख आणि तळमळ कॅप्टनच्या नजरेत स्पष्ट दिसून येते. जहाजावरील इतर कर्मचारी कॅप्टनला छोट्या बोटीतून निघून जाण्यास सांगतात मात्र कॅप्टन शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जहाजावर थांबण्याचा निश्चय करतात. या कथेत शेवटी कॅप्टनचा अंत होतो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कथेत मोठा ट्विस्ट आहे. ही बुडणारी नौका शरद पवार यांनी वादळातून किनारी लावली खरी पण यात मोठा आधार होता तो कॅप्टन जयंतराव पाटील यांचा !
स्व. राजारामबापू पाटील हे स्वतंत्रोत्तर काळातील पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते. सहकार, शिक्षण या चळवळीच्या जोरावर बापूंनी राज्यभरात मोठे नाव कमावले. राज्याच्या महसूल मंत्रीपदापर्यंत त्यांनी यश गाठले होते. गणितं जुळून आली असती तर मुख्यमंत्रीपदाची माळही बापूंच्या गळ्यात पडली असती पण मुख्यमंत्री पदाने त्यांना हुलकावणी दिली. याच राजारामबापू यांचा धाकटा मुलगा म्हणजे जयंता ! 1962 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत बापू पहिल्यांदा विजयी झाले आणि लगेचच जयंत पाटील यांचा जन्म झाला. त्यामुळे त्यांना 'जयंत' म्हणजे विजयी असे नाव दिले. आपल्या नावाप्रमाणे हा विजय, जयंत पाटील आजपर्यंत खेचुन आणत असल्याचे आजच्या निकालातून स्पष्ट झाले.
90 च्या दशकात जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात एंट्री घेतली आणि आजपर्यंत सातव्यांदा राज्याच्या विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. अर्थमंत्री म्हणून तब्बल 9 वेळा राज्याचा अर्थ संकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे तर ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, जलसंपदा मंत्री अशी पदाची पदेही त्यांनी राज्याच्या राजकारणात भूषविली आहेत. 2018 साली जयंत पाटील यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी झाली होती. पक्षाची न राज्यात, न केंद्रात सत्ता, पक्षाच्या नेत्यांमागे विविध तपास संस्थांचा घेरा, पक्षाला लागलेली गळती जणूकाही शनीची महादशाच सुरू असलेल्या कालखंडात जयंत पाटील यांनी हे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारले.
2019 साली पक्षाचे मोठे नुकसान झाले होते. लोकसभा निवडणुकीत हवे तसे यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साली एकीकडे लोक पक्ष सोडून जात होते आणि जयंत पाटील कार्यकर्त्यांना खचून न जाता लढण्याचा प्रवृत्त करत होते. त्यासाठी त्यांनी विविध दौरे, विविध कार्यक्रम आखले वर कार्यकर्त्यांना अॅक्टिव्ह ठेवले. परिणामी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 54 जागांवर विजय प्राप्त झाला. त्याकाळात झालेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. पक्ष सत्तेत आला म्हणून जयंत पाटील काही शांत बसले नाही. राष्ट्रवादी परिवार संवाद या बॅनरखाली त्यांनी पुन्हा राज्यभरात दौरा केला व नवनवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडून घेतले. फक्त अडीच वर्षे चाललेल्या महाविकास आघाडी सरकारने कोव्हीडनंतर लोकांच्या मनात घर केले पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार अडीच वर्षांतच पडले. राज्याच्या राजकारणात असा भूकंप कधीच झाला नव्हता. हा भूकंप झाल्यानंतर राज्यातील जनतेला कल्पनाही नव्हती की पुढे आणखी एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या मार्गावर आहे.
तारीख होती 2 मे 2023, शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' आत्मचरित्र्याच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा पार पडत असतानाच शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. कार्यकर्त्यांच्या चेहर्यांचा रंगच उडाला. उपस्थित सर्वच जण भावनावश झाले. हा निर्णय कुणाला हवा होता आणि कुणाला नको हे त्या कार्यक्रमानंतर झालेल्या धांदलीत दिसून येत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या तर अश्रुंचा बांध फुटला. दोन दिवसानंतर शरद पवार यांनी निवृत्ती मागे घेतली खरी पण हा विषय इथे संपला नाही तर खऱ्या अर्थाने सुरू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात अजित पवार यांनी आपली खदखद बोलून दाखवली आणि त्याची सुई होती ती जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाकडे. दादांनी जाहीररित्या पक्षाच्या संघटनेत काम करण्याची इच्छा प्रकट केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांचा निर्णय प्रक्रियेत याआधी भागच नव्हता अशी परिस्थिती होती का ? तर उत्तर नाही असं आहे.
अजित दादा पक्षाच्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. बऱ्याचदा तिकीट वाटप आणि इतर बार्गेनिंगमध्येही त्यांचा सहभाग असायचा मग आताच संघटनेत काम करण्याचे, पद भूषविण्याची मानसिकता कुठून आली असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर राज्यातील जनतेला 2 जुलै रोजी मिळाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून शिंदे-फडणवीस सरकारला साथ दिली आणि पाचव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांसारखे नेते जे शरद पवार यांची साथ कधीच सोडणार नाहीत असे चित्र होते त्या नेत्यांनी त्या सभागृहात मंत्रीपदाची शपथ घेऊन अजितदादांना साथ दिली. दुसरीकडे ज्या जयंत पाटील यांच्या विषयी 'जयंत पाटील भाजपमध्ये जातील, शरद पवार यांची साथ सोडतील' अशा वावड्या उठवल्या जायच्या, शेवटी शेवटी तर काँग्रेसमध्ये जातील अशा बातम्या पेरल्या गेल्या पण जयंत पाटील, शरद पवार यांच्या मागे भक्कम उभे राहिले.
लोकसभा निवडणूक तोंडावर होती. पक्षाची दोन शकले झाली होती. अशा परिस्थितीत या निवडणुकीला सामोरे जाणे मोठे जोखीमीचे काम होते. पण शरद पवार आणि जयंत पाटील यांनी हार मानली नाही. आमदार, खासदार आणि काही पदाधिकारी पळून गेले असले तरी राज्यातील जनता ही पवार साहेबांच्या बाजूने होती. हे या दोघांनीही ओळखले होते. पण बारामती आणि शिरूर मतदारसंघ सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारांची मोठी टंचाई होती. अशा परिस्थितीत शरद पवार यांना नियोजनाच्या गडबडीत न ठेवता ही जबाबदारी जयंत पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. शरद पवार गटाकडून सर्वात पहिली जोरदार खेळी झाली ती अहमदनगर येथून.
पक्ष दुभंगला तेव्हा अजितदादांसोबत गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गट सोडून शरद पवार यांच्याकडे आले. दुसरा धक्का दिला तो बीडमध्ये. धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बजरंग सोनावणे यांनी देखील ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटात प्रवेश केला आणि या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला बलाढ्य उमेदवार मिळाले. नुकत्याच लागलेल्ा निकालात हे दोन्ही उमेदवार जायंट किलर ठरले. या रणात शरद पवार आणि जयंत पाटील यांनी भाजपलाही सुट्टी दिली नाही. दोघांनी भाजपला जोरदार धक्का दिला तो माढा लोकसभा मतदारसंघात. माढा मतदारसंघात सध्याचे खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती तरीही त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली. ही गोष्ट काही माढ्यात मजबूत असलेल्या मोहिते पाटील गटाला रुचली नाही. अशा परिस्थितीत महादेव जानकर यांना पुढे करून धैर्यशील मोहिते पाटील यांना पळवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने केले. इतकेच नव्हे तर या भागातील गणिते आणखी मजबूत व्हावी यासाठी उत्तम जानकर यांनाही पक्षात घेण्यात आले. माढ्यातील एका सभेत उत्तम जानकर यांनी जयंत पाटील यांनी कसे फासे टाकले याचा वृत्तांतही सांगितला. धैर्यशील मोहिते पाटीलही यांनीही जोरदार विजय मिळविला. दिंडोरी, वर्धा, भिवंडी या भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या आधीपासूनच मनात होते त्यासाठी वर्धा येथे माजी आमदार अमर काळे यांना काँग्रेसमधून आयात करून उमेदवारी दिली तर दिंडोरी येथे भास्कर भगरे सर या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तसेच भिवंडी येथे बाळ्या मामा यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने भाजपची डोकेदुखी वाढवली. या तिन्ही मतदारसंघात दोन केंद्रीय मंत्र्यांना पाडून भाजपच्या किल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आपला झेंडा रोवला. सातारा लोकसभा मतदारसंघात निसटता पराभव झाला नाहीतर 10 पैकी 9 जागांवर यश मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला असता. तिकीट वाटप आणि उमेदवार निश्चित करणे यात जयंत पाटील यांची मोठी भूमिका होती असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील सुत्रे सांगतात. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागात भाजप आणि मुख्यतः नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचंड मोठी लाट असल्याचे जयंत पाटील यांनी जाणले आणि आपला प्रचार ग्रामीण भागातील प्रश्नांवरच केंद्रीत ठेवण्याच्या सुचना त्यांनी उमेदवारांना जयंत पाटील यांनी मतदान पार पडेपर्यंत प्रत्येक उमेदवाराकडून फॉलोअप घेत त्यांना रितसर सुचना देण्याचे कर्तव्य पार पडले आणि अनेक उमेदवार त्यांच्या विजयाचे श्रेय जयंत पाटील यांना देत आहेत.
काल जाहीर झालेल्या निकालात 10 पैकी 8 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पक्षाने स्वतःचा स्ट्राईक रेट प्रचंड उंचीवर नेऊन ठेवला आहे. याआधी स्व. आर आर पाटील हे प्रदेशाध्यक्ष असताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 9 जागा जिंकल्या होत्या मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने तब्बल 18 जागा लढवल्या होत्या. पण यंदा राष्ट्रवादीने 10 जागा लढवल्या त्यातील 8 जागा जिंकून 80% स्ट्राईक रेट गाठला आहे. या विजयामुळे खरी राष्ट्रवादी कोणती आणि लोकांच्या मनात कुणासाठी स्थान आहे हे तर स्पष्ट झालेच पण ज्या जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्न निर्माण करण्यात आले होते, ज्या जयंत पाटील यांच्याबाबत वावड्या उठवल्या जात होत्या. पण या सर्व गोष्टींवर मात करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कॅप्टनशीपवर निर्वादितपणे शिक्कामोर्तब झाला आहे.