मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमास उद्या (७ जून) नागपरमध्ये हजेरी लावत आहेत. आरएसएसच्या कार्यक्रमास प्रणव मुखर्जी यांनी उपस्थित रहावे की, राहू नये याबाबत देशभरात चर्चा रंगली होती. पण, प्रणव मुखर्जी आपल्या निर्णयावर ठाम राहीले. दरम्यान, त्यांच्या उपस्थितीवरून देशभरात सुरू झालेल्या चर्चेला कोणतीही प्रतिक्रीया देणे त्यांनी टाळले. त्यामुळे त्यांच्या या सूचक मौनाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली. नाही म्हणायला 'आनंद बझार पत्रिका' नावाच्या एका बंगाली दैनिकाला मुलखत देत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण, त्याने गुंता सुटण्याऐवजी संभ्रमच अधिक निर्माण झाला. 'मला जे काही बोलायचे ते मी नागपूमध्येच बोलेन', असे मुखर्जी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा उत्सुकता वाढली असून, नागपूरमधील कार्यक्रमात प्रणव मुखर्जी आता काय बोलणार याकडे आता देशातील सर्वांचे लक्ष लागले आहेत.
प्रणव मुखर्जी यांनी आनंद बजार पत्रिका या बंगाली वृत्तपत्रास एक मुलाखत दिली. या मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरादाखल मुखर्जी यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेले निमंत्रण मी स्विकारले. हे निमंत्रण स्विकारल्याचे समजताच मला अनेकांची पत्रे आली तसेच अनेकांनी फोनही केले. मी सर्वांची मते ऐकली पण, पण कोणालाही उत्तरे दिली नाहीत. पण, मला जे बोलायचे आहे ते मी नागपूरमध्येच बोलेन. माझी भूमिका मी नागपूरमध्येच मांडेन असे मुखर्जी यांनी म्हटले होते.
नागपुरातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ७ जूनला संध्याकाळी ६.३० वाजता रेशीमबाग मैदानावर होणार आहे. या प्रशिक्षण वर्गाची सुरूवात १४ मे पासून झाली होती. या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी भूमिका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक पत्र लिहून व्यक्त केली होती. तर, काँग्रेसमधले काही वरिष्ठ नेते जयराम रमेश, सी. के. जाफर शरीफ, रमेश चेन्निथला यांनी प्रणव मुखर्जी यांना संघाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला आहे.