मुंबई : डिजिटायझेशनच्या या अतिशय वेगवान अशा युगात निवडणूक यंत्रणाही मागे राहिलेली नाही. याच धर्तीवर आगामी निवडणुकीचं वातावरण पाहता नागरिकांना/ मतदारांना विविध सेवा एका क्लिकद्वारे उपलब्ध करून देण्यासाठीच ही यंत्रणा सज्ज झाली आहे. ज्याअंतर्गत काही ऍप तयार करण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुविधेसाठी तयार केलेल्या पी डब्ल्यू डी ॲप, सी-व्हिजिल ऍप आणि एनजीआरएस सिटीझन ऍप या तीन ऍपना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. "सुलभ निवडणूक" या ध्येयाला समोर ठेवत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ मतदार संघांत दिव्यांगांसह सर्वच मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणूनही मतदान केंद्र तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. मिलिंद बोरीकरांनी दिली.
पी डब्ल्यू डी ऍप
दिव्यांगांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वतोपरी सहकार्य करण्याकरिता पर्सन विथ डीसएबिलिटीज (पीडब्ल्यूडी) हे ऑनलाईन ऍप कार्यान्वित करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना विधानसभा निवडणुकांसंदर्भात सर्व माहिती मिळण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी पीडब्ल्यूडी ॲपवर नोंदणी करावी. मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी त्यांच्या घरून ने-आण करण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध आकारवून देण्यात येणार आहे. या ॲपवर दिव्यांग मतदारांकरिता निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती, मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध आहे. प्रत्येक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यामार्फत विशेष प्रशिक्षित स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत. हे स्वयंसेवक मुंबई लोकल रेल्वेमधील दिव्यांगांच्या डब्याला भेट देऊन दिव्यांग मतदारांकडून त्यांच्या अडीअडचणींविषयी माहिती घेत आहेत व मतदानाविषयी जनजागृतीदेखील करत आहेत. तसेच प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांच्या मदतीसाठ एक स्वतंत्र कक्षही स्थापन करण्यात आला आहे.
सी-व्हिजिल ऍप
निवडणुकीत पारदर्शकता आणण्याच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने मतदारांना थेट सहभागी करून घेत सी-व्हिजिल ऍप तयार केले आहे. नागरिक आपली ओळख न देता निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत असलेल्या गैरकारभाराबाबतची माहिती या ऍपद्वारे देता येऊ शकते. उमेदवार, राजकीय पक्ष किंवा त्यांच्या समर्थकांनी निवडणूक प्रचारामध्ये कोणत्याही नियमांचे किंवा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास मतदार या ॲपद्वारे आपली तक्रार नोंदवू शकतात. यामध्ये मतदारांना संबंधित घटनेचे छायाचित्र अथवा व्हिडीओ तक्रारीचा पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. या ऍपवर प्राप्त तक्रारींची तात्काळ दखल घेतली जात आहे. .
एनजीआरएस सिटीझन ऍप
नागरिकांच्या निवडणूक आणि मतदानविषयक कोणत्याही तक्रारींचे निवारण करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय तक्रार निवारण यंत्रणा (एनजीआरएस) हे ऍप सुरु केले आहे.