डंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर, सकाळी मध्य रेल्वे तासभर ठप्प

डंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर घुसल्याची घटना कल्याणजवळच्या आंबिवली रेल्वे स्थानकात घडली.

Updated: Jan 3, 2020, 12:30 PM IST
डंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर, सकाळी मध्य रेल्वे तासभर ठप्प title=

कल्याण : डंपरने रेल्वे गेट तोडून रुळांवर घुसल्याची घटना कल्याणजवळच्या आंबिवली रेल्वे स्थानकात घडली. पहाटे पाचच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत रेल्वेच्या ओव्हर हेड लाईनचं नुकसान झांलं त्यामुळे कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी मध्य रेल्वेची सेवा तब्बल एक तास ठप्प झाली होती. परिणाणी उपनगरीय गाड्यांसह मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या.

या घटनेने मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडाला.ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं बहुतांश स्थानकांनर तोबा गर्दी झाली होती. 

गाडीत चढता यावं यासाठी प्रवाशांनी रुळांवर उडी मारली आणि रुळांवरूनच त्यांनी लोकल ट्रेनच्या डब्यात घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ झी २४तासच्या हाती लागलाय. 

अंबरनाथ स्थानकातील ही दृश्य आहेत. जिथं गाडी पकडण्यासाठी प्रवासी थेट रुळावर उतरले आणि डब्यात शिरण्याचा प्रयत्न करु लागले.

जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचा अडचणी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनाला कधी कळणार असा संतप्त सवाल अनेक प्रवाशांनी विचारला आहे. मात्र गाडी पकडण्याच्या नादात प्रवाशांनी असा जीवघेणा प्रयत्न करणंही चुकीचं आहे.