मुंबई : प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे या दाम्पत्याची वेगळी ओळख देण्याची आवश्यकता नाही. आपल्या समाजकार्याने हे दोघेही आणि संपूर्ण आमटे कुटुंब जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे.
या कुटुंबाच्या साधेपणाबद्दल आपण अनेकदा पाहिलं आहे तर काहींनी अनुभवलं देखील आहे. पण पुन्हा एकदा यांचा साधेपणा अधोरेखित झाला आहे या फोटोतून. हा फोटो १६ ऑगस्टला पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत हे दोघेही जण मुंबई एअरपोर्टच्या बाहेर आपल्याकडे असलेल्या डब्यातील जेवण करताना दिसत आहे. अतिशय साधी देहबोली आणि पेहराव असलेल्या या दोघांनी घरचं जेवण करणं पसंद केलं आहे.
फेसबुकवर अमर घाटपांडे यांनी हा फोटो १६ ऑगस्ट रोजी शेअर केला आहे. हा फोटो आतापर्यंत १५० नेटीझन्सनी शेअर केला असून ६०० हून अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा फोटो कमी वेळात जास्त व्हायरल झाला आहे.
आपल्याला माहितच आहे डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प सांभाळत आहेत. २००८ साली डॉ. प्रकाश आमटे यांना मॅकसेसे या पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याचप्रमाणे २००२ साली त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत अनेक पुरस्कार यांच्या कार्याला देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे डॉ. समृध्दी पोरे दिग्दर्शित डॉ. प्रकाश आमचे - द रिअल हिरो हा सिनेमा देखील या दोघांवर चित्रित करण्यात आला. आणि सिनेमात दोघांची भूमिका नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. हा सिनेमा १० ऑक्टोबर २०१४ साली प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.