महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटला? लघुशंकेच्या निमित्ताने बाहेर गेला आणि...

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक आमदार लघुशंकेसाठी सभागृहाच्या गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदाराविषयी विषयी लघुशंकेच्या निमित्ताने शंका निर्माण झाली आहे. 

Updated: Jul 4, 2022, 09:59 AM IST
महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार फुटला? लघुशंकेच्या निमित्ताने बाहेर गेला आणि... title=

सागर कुलकर्णी, मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एक आमदार लघुशंकेसाठी सभागृहाच्या गेल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदाराविषयी विषयी लघुशंकेच्या निमित्ताने शंका निर्माण झाली आहे. 
 
हे आमदार दुसरे तिसरे कोणी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते होत. आमदार दिलीप मोहिते गेले काही महिने वेगवेगळ्या माध्यमातून पक्षाविषयीची नाराजी आणि सरकार विषयीची नाराजी व्यक्त करत आहेत राज्यसभेचे निवडणूक असो किंवा विधान परिषदेची निवडणूक! राष्ट्रवादीचे सर्व आमदार  एकत्रित मतदानाला येत असताना दिलीप मोहिते मात्र मोबाईल स्वीच ऑफ करून बसले होते. 

त्याचवेळी दिलीप मोहिते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या वेळेस उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पोल मागितल्यानंतर आमदारांची शिरगणती सुरू झाली. गणना सुरू करण्यापूर्वी सभागृहाला पाच मिनिट वेळ देण्यात आला होता. ज्या आमदारांना सभागृहात बसायचे नाही त्यांनी बाहेर जावे आणि ज्यांना तटस्थ राहायचे आहे त्यांनी सुद्धा बाहेर जावे असे सांगण्यात आले.

त्यावेळेस आमदार दिलीप मोहिते स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांना सांगून लघुशंकेला जाऊन येतो असे सांगितले. त्यानंतर सभागृहाचा दरवाजा बंद करण्यात आला. त्यामुळे सभागृहात त्यांना प्रवेश करता आला नाही आणि मतदानातही सहभागी होता आले नाही. महाविकास आघाडी सरकारचे बहुमत कमी झाले असताना, अनेक आमदार अनुपस्थित राहिल्याने आणि समाजवादी पार्टी एमआयएमने देखील वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीचे गणित बिघडले. 

विधान भवन परिसरात उपस्थित असून देखील दिलीप मोहिते मतदानात सहभागी न झाल्याने याविषयी चर्चांना उधान आले आहे. याबाबत स्वतः दिलीप मोहिते यांनी 'झी 24 तास'ला माहिती देताना सांगितले की, मी लघुशंकेसाठी बाहेर गेलो त्यावेळी दरवाजा बंद झाला आणि मला सभागृहात येत आले नाही. त्यामुळे मला मतदान करता आलेले नाही.