मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी अडचणीत आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राणे यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
शिवसैनिक संतोष परबवर 8 नोव्हेंबर 2021 ला जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर नितेश राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे नितेश राणे यांनी कणकवली सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो फेटाळण्यात आल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान नितेश राणे यांचे वकील नितीन प्रधान यांनी युक्तिवाद केला. विधानभवन परिसरात कॅट calling प्रकार घडला. ते प्रकरण जिव्हारी लागलं म्हणून राणे यांना या प्रकरणात गोवले. हल्लेखोराचे केवळ विधान म्हणजे प्राणघातक हल्ल्यामध्ये गुंतले असे होत नाही. तसेच, बँकेच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी षडयंत्र रचले गेले असे त्यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत याची सुनावणी उद्या घेण्याचे निश्चित केले. तसेच, या प्रकरणावर निकाल येत नाही तोपर्यंत नितेश राणे यांना अटक करू नये असे आदेश दिले.